मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाकडून देशद्रोहाचा आरोप करण्यात आला होता. इतकंच नव्हे, तर त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचा राजीनामा सुद्धा न घेतल्याने तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकर आणि शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. आता तेच नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session 2023)  सत्ताधारी बाकांवर जाऊन बसल्यानंतर सडकून टीका केली जात आहे.


देशद्रोह्यांची 'मिर्ची' टाकणं महायुतीच्या 'प्रफुल्लित' कार्यकर्त्यांना 'पटेल' ? 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही आता महायुती सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. मनसेनं नवाब मलिक मुद्यावरून खोचक शब्दात टीका करताना अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते प्रफुल पटेल यांचे इक्बाल मिर्चीसोबत असलेल्या संबंधांकडे लक्ष वेधत हल्लाबोल केला आहे. मनसेनं  हिंदुत्वाच्या श्रीखंडात देशद्रोह्यांची 'मिर्ची' टाकणं महायुतीच्या 'प्रफुल्लित' कार्यकर्त्यांना 'पटेल' ? आणि हो, 'नवाब'चाही 'जवाब' 'पटेल' असाच द्या. ट्विटसोबत प्रफुल पटेल यांची इक्बाल मिर्ची केसमध्ये चार फ्लोअर जप्त करण्यात आले होते, तो बातमीचा जुना स्क्रीनशाॅट जोडला आहे. 






भाजप शिंदे गटाने नवाब मलिकांना घेरले, पण प्रफुल्ल पटेलांवर 'मौनव्रत'


नवाब मलिकांवरून भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये दुफळी निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुती सरकारमध्ये सामील करून घेऊ नये, असं म्हटलं होतं. यानंतर अजित पवार गट कोणती भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं होतं. शुक्रवारी बोलताना अजित पवार यांची चांगली चिडचिड झाल्याचे दिसून आले. 'त्या' पत्राचे मी काय करायचे ते पाहून घेईन तुम्हाला (मीडिया) सांगण्याची गरज नाही, अशी भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना घेतली. 






प्रफुल्ल पटेलांवर भाजपचं मौन 


दरम्यान, नवाब मलिकांविरोधात भाजप आणि शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असली, तरी प्रफुल्ल पटेलांवर भाजपनं मौन बाळगणं पसंत केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवल्यानंतर कोणतीच प्रतिक्रिया दिली. भाजप नेते आशिष शेलार यांनीही प्रफुल्ल पटेलांवरील आरोपावर उत्तर दिलं नाही. भाजप प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकरण वेगळं असल्याचे सांगत पटेलांवर थेट प्रतिक्रिया दिली नाही.


इतर महत्वाच्या बातम्या