Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: गेल्या 30 वर्षांपासून महाराष्ट्राचा तुकडा खाऊनही मराठीविरोधात गरळ ओकणाऱ्यांना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा गर्भित इशारा दिला आहे. आज ठाकरेंच्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना जे बाराखडी शिकणार नाहीत, त्यांचे बारा वाजणार असा इशारा दिला. महाराष्ट्रात मराठी शिकावीच लागेल, असे संदीप देशपांडे म्हणाले. हिंदी भैय्यांनी आम्हाला शिकवू नये, असेही त्यांनी सांगितले. मराठीचा अपमान करणाऱ्यांनी एक तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी किंवा आम्ही कारवाई करू, असाही इशारा देशपांडे यांनी दिला. आज वरळी डोममध्ये संपूर्ण मराठीमय वातावरण असून नेमका कोणता संदेश ठाकरे बंधू या मोर्चातून देणार? याकडे अवघ्या राज्यासह महाराष्ट्राचे लक्ष आहे. दुसरीकडे, सामनामधून ठाकरे बंधूंच्या मिलनावर भावनिक साद घालण्यात आली असून गुजराती जयजयकार करणाऱ्या शिंदेंचा सुद्धा समाचार घेण्यात आला आहे.
सामनामधून भावनिक साद
सामनामध्ये अग्रलेखात म्हटलं आहे की, आज मराठी जनांची स्थिती ही कोंडीत सापडलेल्या वाघासारखी झाली आहे. मराठी जनता महाराष्ट्र राज्यातच असली तरी तिला त्राता-पिता कोणीच नाही, अशी वास्तव अवस्था आहे. वरवर पाहता सर्व काही आमचेच आहे असे दिसते, पण किंचित खोलवर डोकावून पाहता आमचे हक्काचे, न्यायाचे असे कोणीच नाही. महाराष्ट्रावरील, मराठी माणसावरील अन्यायाचा, अपमानाचा अथवा अवहेलनेचा कोणताही सवाल असो, तो लागलीच 'राष्ट्रीय' संदर्भाच्या सबबीखाली दाबून टाकण्यात येतो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हौतात्म्य आणि रक्ताचा अभिषेक झाल्याशिवाय महाराष्ट्राची एकही मागणी पदरात पडलेली नाही. राज्यकर्ते कोणीही असोत, मुंबईची भरमसाट लूट करायची हे धोरण ठरलेलेच आहे. केंद्रीय दिल्लीवाल्यांचा महाराष्ट्राविषयीचा आकस ही इतिहाससिद्ध बाब सर्वश्रुत आहे. महाराष्ट्रातले मोठे नेते दिल्लीत जाऊन बसले, पण एक चिंतामणराव देशमुख सोडले तर दुसऱ्या पुणालाच ही द्वेषाची आणि आकसाची नांगी मोडता आली नाही किंवा बोथट करता आली नाही. महाराष्ट्रावर हिंदी सक्तीचा हातोडा पडला असता दिल्लीतील किती केंद्रीय मंत्र्यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला? किती जणांनी निषेध केला? याचे उत्तर शून्यातच द्यावे लागेल.
केडिया नावाचा एक व्यापारी महाराष्ट्राला आव्हान देत त्याची टांग वर करून सांगतो, "मी महाराष्ट्रात 30 वर्षे राहतो, पण मराठी बोलणार नाही." हे धाडस या लोकांत वाढले आहे. कारण अमित शहा यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट तोडली आहे. मराठी एकजूट तोडून त्यांनी शिंदेसारख्या लोकांना मांडलिक केले. पैशांच्या ताकदीवर माणसे विकत घेण्याचा (स्वाभिमानासह) गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे. तो रोखायचा असेल तर 'हर हर महादेव', 'जय भवानी, जय शिवाजी'चा गजर करत आज वरळीच्या दिशेने मराठी माणसाला कूच करावी लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या