यापूर्वी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांनीही कोपर्डीत पीडीत मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघाले होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव त्यांना कोपर्डीत येण्यापासून रोखलं गेलं.
मुख्यमंत्र्यांकडून निर्भयाच्या कुटुंबीयांचं सांत्वन
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डीला भेट देऊन निर्भयाच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे आणि कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटीलही उपस्थित होते.
पीडित कुटुंबाची काही वेळ भेट घेऊन मुख्यमंत्री माघारी परतले आहेत. या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आठवलेंचा कोपर्डी दौरा रद्द
नगरच्या निर्भयाचा बलात्कार आणि निर्घृण हत्या होऊनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट का घेतली नाही, असा सवाल विचारला जात होता. पण कायद्यातल्या बंधनाने आपण इच्छा असूनही जाऊ शकलो नाही, अशी सबब मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यामुळे आणखी वेळ होण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कोपर्डी गाठण्याचा निर्णय घेतला.