मुंबई : जवळपास महिनाभरापूर्वी म्हणजेच 5 जुलैला राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र आले. हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र मेळावा झाला. मग वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले. दोघांमध्ये या गाठीभेठी होत राहिल्या. मात्र दोन्ही ठाकरेंच्या युतीचं काय? या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. उद्धव ठाकरेंनी वारंवार युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली. पण राज ठाकरे मात्र पत्ता उघड करायला तयार नव्हते. याचदरम्यान मनसेच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यात त्यांनी एक वक्तव्य केलं आणि युतीच्या चर्चांना पुन्हा वेग आला.

महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी एकत्र येण्याचं पहिलं सुतोवाच केलं आणि त्यानंतर काही तासांत उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर गेल्या साडेतीन महिन्यात दोन्ही पक्ष आणि दोन्ही नेत्यांची वाटचाल नेमक्या कुठल्या दिशेनं सुरु आहे, याची प्रचिती मनसेच्या आजच्या कार्यक्रमातून आली.

मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचा एकत्र येण्याबाबत उल्लेख केला. युती नसली तरी युतीच्या दिशेनं पडलेलं एक सकारात्मक पाऊल म्हणून या विधानाकडं पाहिलं गेलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

वीस वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता? असं राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. राज ठाकरेंनी या विधानातून योग्य तो संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला असल्याचं मनसे नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून स्पष्ट झालं.

बाळा नांदगावकर म्हणाले की, "मला असं वाटतं की ठाकरे साहेबांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. त्या भावना आमच्याअगोदर पोहोचल्या असल्यामुळे त्या बाबतीत तशा सूचना दिलेल्या आहेत."

संदीप देशपांडे म्हणाले की, " येणाऱ्या महापालिका निवडणुका असतील त्यादृष्टीनं काय तयारी साहेबांना अपेक्षित आहे, पक्षबांधणीत काय गोष्टी करायच्या आहेत, मतदारयादीत कुठल्या गोष्टी अपेक्षित आहेत, याबाबतीतलं मार्गदर्शन राज साहेबांनी केलं."

मनसैनिकांच्या मनात युतीच्या आशा जिवंत ठेवल्या

अर्थात, उद्धव ठाकरेंचं नाव घेत राज ठाकरेंनी मनसैनिकांच्या मनात युतीच्या आशा जिवंत ठेवण्याचं काम केलं असलं तरी युतीची अधिकृत घोषणा मात्र केलेली नाही. योग्य वेळी त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं म्हणत आपले पत्ते सध्या तरी झाकून ठेवणंच पसंत केलं. ठाकरेंच्या शिवसेनेनं यावर दिलेली प्रतिक्रियाही तितकीच बोलकी आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, "युतीबाबत बोलणी नंतर होतील, संघटना कार्यरत करण्यात महत्त्वाची भूमिका राज ठाकरे बजावत आहेत. "

शिंदे-भाजपची टीका

शिदेंच्या शिवसेनेनं मात्र अजूनही आशा सोडली नसल्याचं चित्र आहे. युती करणं किंवा न करणं हा राज ठाकरेंचा प्रश्न आहे असं म्हणताना, उद्धव ठाकरेंच्या जुन्या अनुभवांची आठवण करून द्यायला शिंदेंचे नेते विसरलेले नाहीत.

राज ठाकरेंनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. ते स्वतःचा निर्णय घेऊ शकतात. त्यांना यापूर्वी कशी वागणूक मिळाली हे त्यांनी बघितलंय. राज हे चांगले नेतृत्व असून त्यांना आमच्या कायम शुभेच्छा असतील असं माजी मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

आजवर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सावध पवित्रा घेणाऱ्या भाजपानं आता ठाकरे बंधूंवरच्या टीकेची धार वाढवल्याचं दिसलं. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "ज्यांची निवडणूक लढविण्याची तयारी नाही, ते लोक असे विधान करतात. उद्या निवडणुका लागल्या तरीही आम्ही तयार आहोत. एक कोटी 51 लाख सदस्य असणार भाजप आणि अजित पवार, एकनाथ शिंदे तयार आहेत. ते काय करणार हे माहत नाही, मात्र आमची तयारी पक्की आहे."

अगोदर मराठी विजय मेळावा, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा वाढदिवस या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. मात्र आतापर्यंत राज यांनी आपल्या तोंडून एकत्र आल्याची भाषा करणं टाळलं होतं. त्यांच्या आजच्या विधानानं राज यांच्याकडून आणखी एक पाऊल पुढं पडल्याचं मानलं जातंय. दोन्ही ठाकरेंची यापुढची पावलं कशी पडतात आणि युतीची सप्तपदी ठाकरे बंधू पूर्ण करतात का, याचीच आता उत्सुकता असणार आहे.

ही बातमी वाचा: