नाशिक : राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशात सरकारकडून सोशल डिस्टन्सिंग राखण्यासह मास्क लावण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले जात आहेत. असं असताना मनसे प्रमुख राज ठाकरे मात्र जागोजागी विना मास्क फिरत असल्याचं दिसून येतं आहे. एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आलेले राज ठाकरे आज पुन्हा विना मास्क दिसून आले. एवढंच नाही तर राज ठाकरे यांनी यावेळी त्यांच्या स्वागताला आलेल्या माजी महापौरांना 'मास्क काढा' अशा सूचनाही दिल्या.


आज राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत. ते नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक समोर आले. यावेळी बुके देऊन स्वागत करताना राज ठाकरे यांनी त्यांना इशारा करत मास्क काढण्याच्या सूचना दिल्या.


मनसे स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमात राज ठाकरे विनामास्क! गर्दीबाबत विचारल्यावर भडकले, म्हणाले...


राज ठाकरे यांनी यापूर्वीही अनेक ठिकाणी विनामास्क हजेरी लावल्याचं समोर आलं होतं. तसंच मी मास्क घालणार नाही, असं देखील त्यांनी सांगितलं होतं. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमाला देखील ते विनामास्क उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. ते तिथं धुडघुस घालू शकतात. शिवजयंती, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाते. एवढं जर कोरोनाचं संकट पुन्हा येतंय असं दिसत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला, असं राज ठाकरे म्हणाले. मी मास्क घालतच नाही, मी तुम्हालाही सांगतो, असं राज ठाकरे म्हणाले.


"दरेकर असे कसे तुमचे जुने नेते?" मास्क घालत नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा टोला


अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत बोलताना मास्क न घालणाऱ्या राज ठाकरेंवर टीका केली होती. ते म्हणाले की, "काही लोक तर सरळ म्हणतात मी मास्क घालणार नाही. अरं बाबा तुला काही कोरोना होणार नाही. पण तुझ्यामुळे दुसर्‍याला होईल त्याचं काय? दरेकर असे कसे तुमचे जुने नेते?" असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.