मुंबई : "काही लोक तर सरळ म्हणतात मी मास्क घालणार नाही. अरं बाबा तुला काही कोरोना होणार नाही. पण तुझ्यामुळे दुसर्याला होईल त्याचं काय? दरेकर असे कसे तुमचे जुने नेते?" असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानपरिषदेत उत्तर देत होते.
"मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी "मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय", असं उत्तर राज ठाकरेंनी पत्रकारांना दिलं होतं. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विधानपरिषदेत राज ठाकरे यांना टोला लगावला.
अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनाही सोडलं नाही. दरेकरांचं जॅकेट बघूनच कोरोना त्याच्या जवळ गेला नसेल असं म्हणत सभागृहात हसायला लागले.
"एका गोष्टीचं मला विशेष वाटतं की मुख्यमंत्र्यांना, दरेकरांना आणि सभापती महोदयांना कोरोना झाला नाही. विधानसभेत मलाही झाला, फडणवीसांनाही झाला. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे तुम्हाला झाला नसेल. किंवा प्रवीण दरेकर यांचे जॅकेट बघून तो जवळ गेलाच नसेल, म्हटला असेल कुठं जाकिटातून आत शिरायचं, असंही काही झालं असेल तर माहित नाही," असं अजित पवार म्हणाले.
माझ्यावर बिल फाडू नका!
"तिघांनाही कोरोना होऊ नये अशा आमच्या शुभेच्छा असतील. नाहीतर उद्या कोरोना झाला तर म्हणतील तुझीच दृष्ट लागली आणि म्हणून कोरोना झाला, असे म्हणून माझ्या नावावर पावती फाडू नका," असे म्हणत अजित पवारांनी टोमणा मारला. तितक्यात मागून एका सदस्याने 'प्रसाद लाड यांनी ज्यांना ज्यांना जॅकेट दिलं, त्यांना कोरोना झाल्याचं म्हणताच अजित पवारांनी प्रसादने मलाही जॅकेट दिलं होते,' असे सांगितले.
पुरावे द्या कारवाई करु
राज्यात सर्व जिल्ह्यात आणि मुंबईत कोविड सेंटर निर्माण करण्यात आले, असे करुनही संकट काळात विरोधकांकडून संशयाच्या नजरेने पाहण्यात आले. उपाययोजना करताना भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सुरु आहे. परंतु विरोधकांनी भ्रष्टाचार झाला असेल तर त्याचा पुरावा द्या, पुरावा दिल्यावर संबंधितावर तात्काळ कारवाई करु, असे स्पष्ट केले. या काळात अत्यंत वेगाने आणि कठोर निर्णय घेणे भाग पडले त्यामुळे त्या काळात काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या राजकारणामुळे त्या बदल्या झाल्या नसल्याचे सांगत विरोधकांचे आरोप उपमुख्यमंत्री पवार यांनी खोडून काढले.