Majha Katta: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब (BalaSaheb Thackeray) एक वेगळचं रसायन होतं. त्यांचे एखाद्याला खुले आव्हान देणे असो की धमकी देणे हा अंदाजच हटके होता. त्यात आपलेपणाही असायचा आणि चीड, रागही असायचा. बाळासाहेबाचा एवढा दरारा होता की, त्यांचा शब्द म्हणजेच कायदा असे मानले जायचे. त्यांच्या एका इशा-यावर संपूर्ण मुंबई थांबायची. बाळासाहेबांचा हा दरारा राजकरणात नाही तर राज ठाकरेंच्या शाळेत देखील तेवढाच होता. याचा किस्सा स्वत: राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांनी सांगितला आहे. राज ठाकरे शाळेत असताना त्यांना दिलेल्या शिक्षेची दखल घेऊन थेट बाळासाहेब ठाकरेच शाळेत पोहोचल्यानंतर शिक्षा दिलेल्या शिक्षकांनी रडू कोसळले याचा प्रसंग सांगितला आहे.
अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घालणारं व्यक्तिमत्व म्हणजे राज ठाकरे.. त्यांच्या राजकीय मुलाखती अनेक आहेत. पण राज ठाकरे लहान असताना कसे होते? त्यांच्या शालेय जीवनातले किस्से, कॉलेजमध्ये असताना केलेल्या करमाती, अशी सगळी गुपितं आज त्यांची जन्मदात्री आई, कुंदाताई ठाकरे यांनी उलगडली आहेत राज यांच्या आई पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आल्या आहेत.. राज ठाकरे आणि त्यांच्या आईसोबत त्यांच्याच घरी एबीपी माझाचा महाकट्टा रंगला.
राज ठाकरे म्हणाले, मी शाळेत असताना शाळेतील मुलासोबत भांडण झाले. त्यामुळे वर्गशिक्षिकेने शिक्षा म्हणून आम्हा दोघांना गॅलरीत उभं केलं. शाळा सुटेपर्यंत दिवसभर आम्हाला उभं केलं. शाळा सुटल्यानंतर त्या बाई आल्या आणि म्हणाल्या की उद्या पालकांना बोलव. ही त्यांची चूक झाली. दुसऱ्या दिवशी मी आईला सांगितलं तुला बोलवलंय असे सांगितले.
बाळासाहेब थेट मुख्याध्यापकांच्या खोलीत
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत आलो. दहा मिनिटांत शिपाई आला म्हणाला ठाकरे, बोलवलंय. म्हटलं आज परत दिवसभर बाहेर उभं करतायत की काय. मी त्या शिपायाच्या पाठीमागून चालत गेलो. बापूसाहेब रेगेंची खोली पार करून दादासाहेब रेगेंच्या खोलीत आम्ही गेलो. आता शाळेतून काढूनच टाकतायत की काय? असं मला वाटले. आत पोहोचलो तेव्हा त्या दोन्ही वर्गशिक्षिका तिथे होत्या. त्या दोघी रडत होत्या. त्यांच्यासमोर बाळासाहेब बसले होते. माझे वडील बसलेले. दादासाहेब रेगे त्यांना ओरडत होते. बापूसाहेब रेगे बाजूला उभे होते, अशा शब्दांत राज ठाकरेंनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
या प्रसंगाबद्दल सांगताना राज ठाकरे यांच्या मातोश्री म्हणतात, मी शाळेत निघाली तेव्हा बाळासाहेबांनी वडिलांना विचारलं कुठे गेली? वडिलांनी त्यांना घडला प्रकार सांगितला. बाळासाहेबांनी त्यांना गाडीत बसवलं आणि तसेच शाळेत हजर झाले , अशी आठवण राज ठाकरेंनी यावेळी सांगितली.
पाहा व्हिडीओ :