मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभा आहे. संध्याकाळी पाच वाजता सभा सुरु होणार आहे. राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत.


पक्षातील मरगळ झटकून कार्यकर्त्यांसमोर नवे काही संकल्प आणि कार्यक्रम राज ठाकरे ठेवतात का, पक्षाची पुढील वाटचाल, भूमिका काही जाहीर करतात का, याच्याकडे राजकीय वर्तुळासह तमाम मराठीजनांचे लक्ष लागले आहे.

मनसेच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी या जाहीर सभेची घोषणा केली होती. तेव्हापासूनच मनसेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मुंबईत येण्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली होती.

कालच राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. पवारांची आपण सदिच्छा भेट घेतली असल्याचे राज यांनी सांगितले असले, तरी त्यांच्या भेटीतून अनेक समीकरणांचे अंदाज बांधले जात आहेत. त्यामुळे आजच्या शिवतीर्थावरील सभेतून राज ठाकरे काही नवीन भूमिका मांडून, राजकीय समीकरणांना नवे वळण देतील का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.