मुंबई : राज्यासह देशभरात आज गुढीपाडवा अर्थातच हिंदू नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतील गिरगावासह डोंबिवली, ठाण्यात अगदी सकाळपासूनच शोभायात्रांना सुरुवात झाली. ढोलताशांच्या गजरात पारंपरिक कपडे परिधान करुन नववर्षाचं स्वागत करण्यात आलं.


डोंबिवली, ठाण्यात भव्य रांगोळ्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाय बाजारपेठांमध्येही गुढीच्या साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी डोंबिवलीकर दरवर्षीप्रमाणे सज्ज झाले आहेत. बाजारपेठेत गर्दी वाढल्यानं व्यापारी वर्गातही उत्साह आहे.

गुढी उभारण्यासोबतच दाराला तोरण लावून नववर्षाचं स्वागत केलं जातं. त्यामुळं पारंपरिक झेंडूच्या फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे.  फुलं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. शिवाय तोरणं, श्रीखंड यांची खरेदीही जोरात आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याला खरेदी करण्यासाठी आज बाजारपेठांमध्ये मोठी लगबग पाहायलाही मिळणार आहे.