औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औरंगाबाद दौऱ्यावर पत्रकार परिषद घेऊन नोटाबंदी, मराठा आंदोलन आणि सनातन प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. अतिरेकी कुठल्याही जातीचा, धर्माचा असो तो गुन्हेगार म्हणूनच ओळखला जावा. त्यावेळी त्याला कुठल्याही धर्म-जातीचा टॅग लावू नये, असं मत राज ठाकरे यांनी मांडलं.


"सनावरील कारवाईवरुन लक्ष हटवण्यासाठी कम्युनिस्टांना अटक"
सनातनच्या साधकांना झालेल्या अटकप्रकरणी राजकारण होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. कोणाच्या घरी शस्त्र सापडली यावरुन राजकारण होऊ नये. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांना याचं राजकारण करायचं आहे. सनातनच्या मुद्द्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी कम्युनिस्टांना अटक केल्याचा दावाही राज ठाकरे यांनी यावेळी केला.


भीमा-कोरेगाव येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर कम्युनिस्टांना अटक करण्यात आली. मात्र भीमा-कोरेगावच्या घटनेला आठ महिने उलटून गेल्यानंतर ही कारवाई केली. राज्यभरात सनातनच्या विरोधात सुरु असलेल्या कारवाईवरुन लक्ष हटवण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याला राज ठाकरे यांनी दुजोरा दिला.


"नोटाबंदीमुळे काहीही साध्य झालं नाही"
नोटाबंदीनंतर काल रिझर्व्ह बँकेने अंतिम अहवाल सादर केला. या अहवालावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "एका माणसाच्या हट्टापाई नोटबंदी करण्यात आली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार जवळपास 10 हजार कोटी रुपयांच्या नोटा बाद झाल्या. मात्र नवी नोटा छपाई, एटीएम मशिनमध्ये बदल करण्यासाठी जवळपास 15 हजार कोटी खर्च झाले. त्यामुळे नोटाबंदीतून काहीही साध्य झालं नाही."


"मराठा क्रांती मोर्चात तोडफोड करणारे परप्रांतीयच"
मराठा क्रांती मोर्चाने 9 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या बंदच्या दरम्यान 70 कंपन्याची तोडफोड करण्यात आली. तोडफोड करणारे परप्रांतीयच आहेत, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 83 जणांना अटक केली आहे.


राज ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद