मुंबई: 'महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसे स्वबळावरच लढणार', असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज ठाकरेंनी संवाद साधला. यावेळी त्यांना लोकांनी थेट प्रश्न विचारले. त्याच प्रश्नांना राज ठाकरेंनीही रोखठोक उत्तरं दिली.

'मनसेकडे जर युतीचा प्रस्ताव आला तर यावेळी विचार करेल.' असं वक्तव्य काल राज ठाकरे यांनी केलं होतं. याबाबत बोलताना राज ठाकरे सांगितलं की, 'मनसे स्वबळावरच लढणार, अद्याप मी कुणाकडे गेलेलो नाही आणि कुणी माझ्याकडे आलेलं नाही. त्यामुळे या सर्व चर्चांना सध्या तरी काहीही अर्थ नाही.' असं राज ठाकरे म्हणाले.

'युतीसाठी कुणी माझ्याकडे आलेलं नाही आणि मी कुणाकडे गेलेलो नाही'

'काल सकाळच्या वेळी माझ्याकडे एक पत्रकार आले होते. त्यावेळी त्यांनी मला युतीबाबत विचारलं. तेव्हा मी म्हटलं की, जर-तरला सध्या तरी काही अर्थ नाही. मी कुणाकडे गेलेलो नाही आणि कुणी माझ्याकडे आलेलं नाही. तरीही त्यांनी मला पुन्हा विचारलं. तरी कुणी प्रस्ताव घेऊन आलंच तर युती करणार का? शेवटी मी त्यांना म्हटलं. की जर कुणी माझ्याकडे आलंच तर मी विचार करेन. पण या सगळ्याला काहीही अर्थ नाही. जर माझ्याकडे प्रस्ताव आला तर मीडियाला ती गोष्ट कळेलच. युती करणार असल्याची निव्वळ अफवा यावर मी कोणताही बाईट किंवा कोट दिलेला नाही.' असं राज ठाकरे म्हणाले.

'मी ट्रेलर दाखवत नाही, डायरेक्ट पिक्चर दाखवतो'

'ज्यांना पक्षातून बाहेर पडायचं आहे त्यांनी जावं, पक्षात अनेक जवळचे लोक आहेत. मी ट्रेलर दाखवत नाही, डायरेक्ट पिक्चर दाखवतो. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे मी काय करणार ते आताच सांगू शकत नाही', असंही राज ठाकरे म्हणाले.

'राज्याची सत्ता माझ्या हाती देऊन पाहा'

'टोलनाके माझ्या पक्षामुळे बंद झाले. मनसेनं आंदोलनं केली म्हणूनच टोल नाक्यांचा प्रश्न मार्गी लागला. पण अद्याप काही टोलनाके सुरु आहेत. त्याबद्दल लोकं मलाच प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे आता  राज्याची सत्ता माझ्या हाती देऊन पाहा.' असं पुन्हा एकदा राज ठाकरे म्हणाले.

'परप्रांतियांचा मुद्दा अजून बंद झालेला नाही'

परप्रांतियांचा मुद्दा अजून बंद झालेला नाही. आजही परप्रांतियांबाबतचा मुद्दा कायम आहे. दहिहंडीबाबतही पहिल्यांदा मनसेनंच आवाज उठवला होता. असं म्हणत राज ठाकरे यांनी निवडणुकींच्या तोंडावर पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

'संबंध तुटले तरी चालतील पण भूमिका ठाम हवी'

'माझ्या आजोबांनी सांगितलं आहे, संबंध तुटले तरी चालतील पण आपली भूमिका नेहमी ठाम असली पाहिजे. सध्या जातीचं राजकारण सुरु आहे. निवडणुकीच्या तोंडावरच लोकांना हे सुचतं. पण मनसे आपल्या भूमिकेवर ठाम राहणार आहे. असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

'अनेक योजना काँग्रेसच्या काळात आल्या भाजपने त्या फक्त मांडल्या. काँग्रेसने जी योजना केली त्याचं मोदींनी जलपूजन केलं त्यात नवल काय?' असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.