लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा राज ठाकरे दौरा करणार आहेत. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि इतर नेतेही आहेत.
आघाडी सरकारवर घणाघात
दुष्काळ दौऱ्यावर निघताना राज ठाकरेंनी आघाडीसह विद्यमान राज्य सरकारवरही टीका केली. राज ठाकरे म्हणाले, “काँग्रेस राष्ट्रवादीने सिंचनाचे उपाय केले नाहीत. ज्याप्रकारे पाणी अडवलं पाहिजे होतं, तसं अडवलं नाही. आघाडीच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम म्हणजे आजचा दुष्काळ आहे. किंबहुना म्हणूनच आघाडी सरकारला जनतेनं बाजूला सारलं आहे.”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यासाठी रवाना
राज्य सरकारवरही टीकास्त्र
"ट्रेनने किती दिवस पाणी आणणार? ट्रेनने पाणी आणणं हा उपाय नाही. मराठवाड्यातील दुष्काळ हा मानवनिर्मित आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.
“राज्य सरकार अर्थसंकल्पात म्हणालं आहे की, राज्यभरात 33 हजार विहिरी बांधल्या. या 33 हजार विहिरी आहेत कुठे? त्या विहिरींना पाणी लागलं का, की कागदावरच विहिरी आहेत? आणि 18 महिन्यात 33 हजार विहिरी कशा बांधल्या?" असे सवाल करत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
गुढीपाडवा मेळाव्यातही राज ठाकरेंनी राज्य सरकारने बांधलेल्या 33 हजार विहिरींवर प्रश्न उपस्थित केला होता. या विहिरींची पाहणीही राज ठाकरे करणार आहेत.