Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सांगली शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. हे वॉरंट मागील महिन्यात काढण्यात आले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. राज ठाकरे यांना एका जुन्या प्रकरणात हे अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. 


राज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या अजामिनपत्राचे वॉरंट हे वर्ष 2008 मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका गु्न्ह्यातील आहे. राज यांच्याविरोधात भारतीय दंड विधान 109,117,143 आणि मुंबई पोलीस कायदा 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज यांच्याविरोधातील हा खटला जुना आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.  सांगलीतील मनसे कार्यकर्ता तानाजी सावंत यांनी मराठी पाट्या आणि मराठीच्या मुद्यावर आंदोलन केले होते. यावेळी काही दुकाने बळजबरी बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तानाजी सावंत यांच्यासह पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या या गुन्ह्याच्या प्रकरणात सुनावणी सुरू आहे. 


सांगली कोर्टाने या प्रकरणी थेट मुंबई पोलीस आयुक्तांना राज ठाकरे यांना सांगली कोर्टात अटक करून हजर राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. हे वॉरंट 6 एप्रिल रोजी काढण्यात आले होते. मात्र, मुंबई पोलिसांकडून या वॉरंटवर कारवाई झाली नाही.


प्रकरण काय?


2008 साली रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण न्यायालयाच्या आदेशाने राज ठाकरेवर अटकेची कारवाई झाली होती.  या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदाराना भाग पाडले. बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह  10 मनसे कार्यकर्त्याविरोधात आरोपपत्र दाखल।करण्यात आले आहे. सुनावणीच्या तारखांना कोर्टात हजर राहिले नसल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.