Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून शांत असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंची (Raj Thackeray) तोफ आज (27 नोव्हेंबर) पुन्हा धडाडणार आहे. मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. मे महिन्यात राज ठाकरे यांनी औरंगाबादला शेवटची सभा घेतली होती. त्यानंतर काहीच दिवसात राज्यातील महाविकास आघाडीच सरकार कोसळलं आणि राज्यांत नवं सरकार आलं. त्यावेळी राज ठाकरेंच्या निशाण्यावर मशिदीवरील लाऊड स्पीकर आणि तत्कालीन मुख्यमंत्री असल्याचं पाहायला मिळालं होतं. आता त्यांचा निशाण्यावर कोण असणार याकडं संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.


'या' मुद्यावर राज ठाकरे करणार भाष्य


आजच्या सभेत राज ठाकरेंच्या निशाण्यावर नेमकं कोण असणार याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राज्यातलं सध्याचं वातावरण, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, राहुल गांधींनी सावरकर यांच्या बद्दल केलेलं वक्तव्य, राज्यपाल भरतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य,  हर हर महादेव चित्रपटाचा वाद या मुद्यांवर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपटांबाबत राष्ट्रवादीने घेतलेली भूमिका आणि ब्राम्हण विरूद्ध बहुजन निर्माण केलेला वाद याबाबत देखील राज ठाकरे बोलणारं असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हर हर महादेव चित्रपटाच्या विरोधाला याच राजकारणाची किनार असल्याची देखील चर्चा आहे.


राज ठाकरे कार्यकर्त्यांना कोणता मंत्र देणार?


गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळं आज राज ठाकरे पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे. पण या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे पदाधिकारी आणि  कार्यकर्त्यांना कोणता मंत्र देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 


औरंगाबादमध्ये मे महिन्यात राज ठाकरे यांनी शेवटची सभा घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा राज ठाकरेंची सभा होत आहे. औरंगाबादमध्ये सभेत राज ठाकरे यांनी विविध मुद्यांबाबत भाष्य केलं होते. मशिदीवरील लाऊड स्पीकरच्या मुद्यावरुन राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. त्यानंतर काहीच दिवसात राज्यातील महाविकास आघाडीच सरकार कोसळलं आणि राज्यांत नवं सरकार आलं होतं.


महत्त्वाच्या बातम्या:


Raj Thackeray : राज ठाकरे 29 नोव्हेंबरला कोल्हापुरात; मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार