Raj Thackeray on BJP: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपट निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या youtube चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत राजकारणामध्ये एकत्र येण्यासाठी काहीच अडचण नसल्याचे वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आता दुभंगलेली शिवसेना यांच्यामध्ये युतीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात जी चर्चा गेल्या 18 वर्षांपासून होत आहे, त्या चर्चेनं पुन्हा एकदा जोर पकडला होता. इतकेच नव्हे तर राज ठाकरे यांनी जाहीर मुलाखतीमध्ये संकेत दिल्यानंतर त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तेव्हापासून दोनवेळा याबाबत जाहीरपणे भाष्य केलं आणि नुकत्याच दिलेल्या एका वक्तव्यामध्ये ते म्हणाले की, आता थेट बातमीच देऊ. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून पोस्टरबाजी सुद्धा सुरू होती. त्यामुळे कुठेतरी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याला सुरुवात झाली आहे का? अशी सुद्धा चर्चा रंगली होती. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच आज एक वेगळीच राजकीय घडामोड मुंबईमध्ये घडली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (12 जून) राज ठाकरे यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये (Raj Thackeray meets CM Devendra Fadnavis at Mumbai hotel) भेट घेत तब्बल एक तास चर्चा केली. या चर्चेचा तपशील समोर आला नसला, तरी आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आणि संभाव्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असावी, असा राजकीय अंदाज लावला जात आहे. त्यामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यापासून फारकत घेत महायुतीशी जुळवून घेणार की हे सर्व बाजूला सारून उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुळवून घेणार? याबाबत तर्कवितर्क पुन्हा लावले जात आहेत. 

मी आमचे किरकोळ वाद बाजूला ठेवू शकतो

राज यांनी माझ्यासाठी महाराष्ट्राचे हित मोठे आहे तर इतर सर्व काही दुय्यम आहे. मी आमचे किरकोळ वाद बाजूला ठेवू शकतो. मी उद्धव यांच्यासोबत काम करण्यास तयार आहे, परंतु प्रश्न फक्त एवढाच आहे की ते माझ्यासोबत काम करण्यास तयार आहेत का," असे ते म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यांनी सांगितले की ते त्यांचे मतभेद बाजूला ठेवून राज्यातील लोकांसाठी आणि मराठी भाषेसाठी काम करण्यास तयार आहेत. उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत जाहीर वाच्यता केल्यानंतर राज ठाकरे यांनी अवघ्या 15 दिवसांपूर्वी जाहीरपणे भाजपच्या राजकारणावर सडकून टीका केली होती. इतकेच नव्हे तर महायुतीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या नेत्यांवरूनही त्यांनी तोफ डागली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या शपथविधी कार्यक्रमांमध्ये ज्या नेत्यांना भ्रष्टाचाराचा आरोप करत भाजपकडून विरोध झाला त्या नेत्यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्या फोटोचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी टोला लगावला होता. 

राज ठाकरे काय म्हणाले होते फोटोवरून? 

राज ठाकरे म्हणाले की, मी एक फोटो पाहिला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार, सुनील तटकरे, अशोक चव्हाण, नारायण राणे, छगन भुजबळ आणि इतर नेत्यांच्या मध्यभागी बसले होते. मी तो फोटो पाहिला तेव्हा मला आश्चर्य वाटले आणि विचार केला की भाजपचे समर्थक त्याकडे कसे पाहत आहेत? त्यांना वाटले पाहिजे की आम्ही त्यांना सत्तेवरून हाकलून लावण्यासाठी खूप मेहनत केली आणि आता ते त्यांच्यासोबत सरकारमध्ये बसले आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी असे सुद्धा म्हटले होते की राज्याच्या राजकारणातून पवारांनी ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, कधीही संपला जाणार नाही असे त्यांनी निक्षून त्यावेळी सांगितलं होतं. त्यामुळे राज ठाकरे आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर या भूमिकेवर ठाम राहणार की महायुतीसोबत जुळून घेणार हाच प्रश्न आता चर्चिला जात आहे. 

राज्यामध्ये भाजपकडून ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न

राज्यातील विचार करता राज म्हणाले की माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी सर्वात प्रथम राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकला होता. त्यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे होते.माझे वडील श्रीकांत ठाकरे सुद्धा होते.त्यांनी संगीतावर प्रभाव टाकला होता. त्या दोघांनंतर उद्धव आणि मी असल्याचे राज म्हणाले होते. राज्यामध्ये भाजपकडून ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू यामध्ये कोणताही वाद नसल्याचे त्यांनी म्हटलं होतं. मात्र तो ब्रँड संपवणं शक्य नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले होते. राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये 'इंडिया टुडे'च्या कार्यक्रमांमध्ये बोलताना हे वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, नेते बदलले तरी ब्रँड राहतील.

पहलगामवरूही राज ठाकरे यांची खोचक टीका 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी कुठे आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि पाकिस्तानशी युद्ध हा पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले. युद्ध हा त्या दहशतवाद्यांना मारण्याचा पर्याय नाही. आम्ही जे केले ते युद्धच नव्हते. तुम्हाला युद्धाबद्दल काय माहिती आहे? गाझापट्टी पहा आणि मग तुम्हाला कळेल की युद्ध कोणत्या प्रकारचा विनाश आणते. आम्ही जे साध्य केले आहे ते ठीक आहे, पण आमच्या 26 लोकांना मारणारे दहशतवादी कुठे आहेत? ते अजूनही मोकाट आहेत, असे ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या