Shiv Sena Shinde Faction on Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आज (दि. 5 जुलै) वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लबोल केला. एक गद्दार बोलला, जय गुजरात. किती लाचारी करायची? हिंदी सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांचा विचारांचा पाईक होईल का? असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. आता यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्या भाषणात मराठीचा मुद्दा दिसला. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या भाषणात नेहमीप्रमाणे नटदृष्टपणा, टोमणे होते. मराठीचा मुद्दा कुठेही नव्हता. त्यांचा जो काही पराजय झालेला आहे त्याची सल त्या भाषणातून दिसून आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा पद्धतीने राज ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली होती. आता मुंबईच नाही तर महाराष्ट्राची सत्ता मला मिळवायची आहे तर राज ठाकरे यांनी सोबत यायला पाहिजे. युती करायला पाहिजे, ही याचना त्यांच्या भाषणातून दिसून आल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.
शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना डिवचले
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या ट्विटरवरून ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर निशाणा साधण्यात आला आहे. एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक, एक उजवा, दुसरा डावा, एक धाकला असून थोरला, दुसरा थोरला असून धाकला, एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी, एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड! एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता, एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा, एकाचा मराठीचा वसा, दुसरा भरतोय खिसा, एकाचा स्वतंत्र सवतासुभा, दुसरा नुसताच आयतोबा, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या ट्विटरवरून उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलंय.
संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
तर ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, आजचा जो त्यांचा मेळावा झाला तो चांगला झाला. महाराष्ट्राने दोन भाऊ एकत्र पहिले. मात्र सर्वांची नजर राज ठाकरे यांच्याकडे होती. राज यांचा रोख कोणाकडे याकडे लक्ष होते. राज ठाकरेंनी अत्यंत संयमी आणि मुद्देसूद भाषण केलं. मराठी का हवी, हिंदी का नको, घडलेल्या घटनेवर आधारित त्यांचं भाषण होतं. काही लोक राजकीय अंदाज बांधायला लागले होते, मात्र तसे काहीही नाही. मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी एकत्र आलो, असे राज म्हणाले, असे त्यांनी म्हटले.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर जय गुजरातचा नारा दिला. यावरून उद्धव ठाके यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. एक गद्दार बोलला, जय गुजरात. किती लाचारी करायची? हिंदी सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांचा विचारांचा पाईक होईल का? असे त्यांनी म्हटले. हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न केला, तर शक्ती अशी दाखवू पुन्हा डोकं वर काढणार नाही, असा गर्भित इशारादेखील त्यांनी दिला. म महापालिकेचा नाही, महाराष्ट्राचा सुद्धा आहे, आम्ही तो काबीज करू, असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युतीचे संकेत दिले.
आणखी वाचा