Avinash Jadhav : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत (Ayodhya) दाखल झाले आहेत. अविनाश जाधव यांनी अयोध्येत रामलल्लाचे दर्शनही घेतले असून मराठी माणसाला चॅलेंज करायचं नाही असं जाधव यांनी म्हटलं आहे. याबरोबरच आम्हाला कोणीही अडवू शकत नाही, आम्ही ठरवल्यावर कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट पूर्ण करतोच असंही जाधव यांनी म्हटलं आहे. अविनाश जाधव यांनी अयोध्येतून फेसबुक लाईव्ह करून अयोध्येत दाखल झाल्याची माहिती दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जून म्हणजे आज अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती. मात्र, या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला होता. उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. त्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांना अयोध्या दौरा पुढे ढकलावा लागला आहे. परंतु, अविनाश जाधव यांनी काही कार्यकर्त्यांसोबत अयोध्येत जाऊल श्रीरामाचे दर्शन घेतले आहे.
काय म्हणाले अविनाश जाधव?
श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर अविनाश जाधव यांनी तेथूनच फेसबुक लाईव्ह करून आपण अयोध्येत दाखल झाल्याचे सांगितले. शिवाय मराठी माणसाला चँलेज करायचे नाही असे म्हटले आहे. "आजची तारीख 5 जून, राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होता. पण काही कारणास्तव तो रद्द झाला. पण त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी तो पूर्ण केला. मराठी माणसाचा स्वाभिमान जपला. आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. एखादी ठरवल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट आम्ही पूर्ण करतोच. काहीवेळापूर्वीच आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले. याबरोबरच बृजभूषण सिंह यांचा कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणीही आम्ही गेलो होतो. मराठी माणसाला कोणीही चँलेज करायचे नाही. आम्ही अयोध्येत आलो आहोत. आम्हाला धमक्या द्यायचे बंद करा. राज ठाकरे ज्यादिवशी आदेश देतील त्या दिवशी या सर्वांना यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्हमधून दिला आहे.