मुंबई : येत्या काही महिन्यांमध्ये रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती निघणार आहे. या रेल्वे भरतीमध्ये केवळ महाराष्ट्रातील तरुण-तरुणींनाच नोकरी मिळायला हवी. हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आग्रह आहे. परंतु या भरतीत बाहेरचे घुसणार नाहीत, यावर लक्ष ठेवा, असा आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे.


रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, यंदा रेल्वेमध्ये हजारो पदांसाठी भरती निघणार आहे. यासदर्भात राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत मराठी तरुण-तरुणींनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांन त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, रेल्वेभरतीत मराठी मुलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2008 साली एक मोठे आंदोलन उभे केले होते. या आंदोलनामुळे रेल्वे भरतीच्या परीक्षांच्या जाहिराती स्थानिक वृत्तपत्रांमध्ये येऊ लागल्या, आणि त्या-त्या राज्यातील स्थानिक भाषेत परीक्षा देणे आणि नोकरीत निवड होण्यासाठी स्थानिक भाषा येणे सक्तीचे करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचा विजय होता.

आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर रेल्वे भरती आहे. या रेल्वे भरतीचा फायदा माझ्या मराठी तरुण-तरुणींनी घ्यायलाच हवा. परंतु त्यासाठी फॉर्म कसा भरावा, तयारी कशी करावी याचे मार्गदर्शनही त्यांना व्हायला हवे. याच उद्देशाने माझे पक्षातील सहकारी अभिजित पानसे यांनी एका तज्ज्ञांची मुलाखत घेतली आहे. त्याचा हा दुवा. (फेसबुक पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी अभिजित पानसे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा व्हिडीओदेखील आहे)

त्याखाली राज यांनी मराठी तरुण-तरुणींना आवाहन केले आहे की, ही 20 मिनिटाची मुलाखत शांतपणे ऐका. त्यात सांगितल्याप्रमाणे तयारी करा, अर्ज भरा. झटून अभ्यास करा, यश नक्की मिळेल. आणि तरीही काही अडचण आलीच तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच तुमच्या पाठीशी.



तसेच या भरतीत बाहेरचे घुसणार नाहीत आणि फक्त महाराष्ट्रातील मुला-मुलींनाच नोकरी मिळेल याकडे महाराष्ट्र सैनिकांनी लक्ष ठेवावे, असे आदेश राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना दिले आहेत.