Raj Thackeray and Uddhav Thackeray Mumbai Morcha: त्रिभाषा सूत्रातील हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी थेट सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे संयुक्तपणे मोर्चा काढणार आहेत. मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानदरम्यान हा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “या मोर्चात कोणताही पक्षाचा झेंडा नसेल. हा फक्त मराठीचा अजेंडा असेल. आणि या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करणार आहे.” राज ठाकरे यांनी या आंदोलनात सर्वपक्षीय नागरिकांनी, तसेच साहित्यिक, कलाकार, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही केले आहे. आता या मोर्चाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने (Akhil Bharatiya Marathi Sahitya Mahamandal) पाठिंबा दर्शवला आहे.
राज्य शासनाच्या त्रिभाषा सूत्रातील सक्तीविरोधात ५ जुलै रोजी होणाऱ्या भव्य मोर्चात आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळही सक्रिय सहभाग घेणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली असून, साहित्य संस्था, मराठी साहित्यिक, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक
दरम्यान, हिंदी सक्ती विरोधात पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक दिली जाणार आहे. मनसेकडून मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये जाऊन मुंबईकरांना साद घातली जाणार आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी देखील मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून थेट नागरिकांसोबत चर्चा केली जाणार आहे. मनसे नेते संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्ते मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकात 12 वाजता जाऊन नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहेत.
29 तारखेच्या जाहीर सभेचे एकनाथ शिंदेंना निमंत्रण
तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात 29 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीकडून निमंत्रण देण्यात आले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही सभा होणार असून, त्रिभाषा सूत्रांतर्गत करण्यात आलेल्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात ही सभा पार पडणार आहे. या सभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर विविध पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. राज ठाकरे यांना यापूर्वीच निमंत्रण देण्यात आले असून, त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या सभेला उपस्थित राहावे, अशी विनंती समितीने केली आहे.
आणखी वाचा