अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे.
बार्शी तालुक्यातही अवकाळी पाऊस
बार्शी तालुक्यातील इंदापूरमधील शेतकरी शिवाजी घुगे यांची दीड एकर द्राक्ष बाग ऐन काढणीच्या वेळी वाऱ्याने जमीनदोस्त केली. या नुकसानीमुळे शिवाजी घुगे यांचं जवळपास 5 ते 6 लाखांचं नुकसान झालं आहे.
ऐन काढणीच्यावेळी झालेल्या या नुकसानाने घुगेंच्या तोंडचं पाणीच पळालं आहे. वर्षभर कष्ट करुन औषधे, फवारणी, मजुरी असा जवळपास 3 ते 4 लाखांचा खर्च त्यांनी केला होता. त्यामुळे त्वरीत पंचनामा करुन नुकसान भरपाईची मागणी शिवाजी घुगे यांनी केली आहे.
सरकोली ,ओझेवाडी परिसरात गारांसह पाऊस झाला. यामुळे द्राक्ष, ज्वारी, गहू पिकांचं नुकसान झालं आहे. पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव येथेही गारपीट झाली.
दरम्यान मराठवाड्यातील आठपैकी बहुतांश जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. लातूरमध्ये दुपारपासून पावसाने थैमान घातल्यानंतर बीड, उस्मानाबाद आणि नांदेडमध्येही गारांसह पाऊस झाला.
गेल्या चार वर्षांपासूनच्या दुष्काळातून सावरत असलेल्या मराठवाड्याची चिंता पावसाने पुन्हा एकदा वाढली आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या उमेदीने कामाला लागला होता. पण अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हाताशी आलेलं पीक गेलं आहे.
संबंधित बातम्या :