Chhatrapati Sambhaji Nagar Rainfall Update: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji NagarCity) आज सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. यावेळी जोरदार वारा देखील पाहायला मिळाला. दरम्यान जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील काही भागात झाडे उन्मळून पडले असल्याचे समोर येत आहे. तर शहरातील रोपळेकर चौकात रस्त्याने जाणाऱ्या दोन मोटारसायकल चालकांच्या अंगावर झाड पडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे अग्निशमन दलाला तत्काळ पाचारण करून मोटारसायकल चालकांना बाहेर काढण्यात आले आहे. ज्यात ते जखमी झाले आहेत. 


महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील तीन ठिकाणी झाडे पडल्याची माहिती अग्निशमन विभागास मिळाली. ज्यात रोपळेकर चौक येथे देवगिरी बँक शेजारी झाडे पडल्याने याच्यात दोन दुचाकीस्वार वाहनासह अडकले होते. अग्निशमन दलातील जवानांनी तत्परता दाखवून अडकलेल्या वाहनचालकांना आणि वाहनांना त्वरित काढले. वाहन चालक किरकोळ जखमी झाल्याची वृत्त आहे. याशिवाय सिंधी कॉलनी येथे एक झाड  रस्त्यावर पडला आहे. तर या दोन्ही ठिकाणी अग्निशमन दलाच्या पथकाने रस्ता मोकळा केला आहे. 


याशिवाय उल्कानगरी या ठिकाणी झाड विद्युत तारांवर पडल्याची माहिती मिळाल्याने ठिकाणी देखील  अग्निशमन पथक रवाना झाले आहे. तसेच प्रताप नगर म्हाडा कॉलनी स्मशानभूमी जवळ एका रिक्षावर झाड पडले असून, ते हटविण्यासाठी जेसीबी पाठविण्यात आले आहे. तसेच डॉ.हेडगेवार हॉस्पिटल जवळ पडलेले झाड उचलण्यासाठी यंत्रणा पाठविण्यात आली आहे. उस्मानपुरा तारा पान सेंटर जवळ व मयूर पार्क या ठिकाणी पावसाचे साचलेले पाणी काढण्यासाठी पंपिंग मशीन पाठविण्यात आले आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच बेगमपुरा येथे पावसामुळे पाणी साचले असून, साचलेले पाणी काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात येत आहे. 


वाहतूक कोंडी...


आज सायंकाळी अचानक छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पावसाला सुरवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ झाली. तर पाऊस उघडताच शहरातील अनेक चौकात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. दरम्यान अशीच वाहतूक कोंडी गुलमंडी चौकात देखील दिसून आली. चारही बाजूने वाहने जाम झाले होते. त्यामुळे वाहन काढण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. तर याच वाहतुकीत एक रुग्णवाहिका देखील अडकली होती. विशेष म्हणजे या चौकात एकही वाहतूक पोलीस उपस्थित नव्हता. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Photo: पाऊस पडताच संभाजीनगर शहरात ठिकठिकाणी वाहतूक जाम, रुग्णवाहिकाही अडकली