उस्मानाबादमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू, राज्यभरात पावसाची हजेरी
एबीपी माझा वेब टीम | 03 Jun 2016 04:17 PM (IST)
उस्मानाबादः दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याला वरुणराजाने काहीसा दिलासा दिला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वारा आणि जोरदार गारपीटीसह पावसाने हजेरी लावली. यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जनावरंही दगावल्याची शक्यता आहे. उस्मानाबाद शहरात वारा इतका सुसाट होता की, विजेचे खांब कोसळून पडले आहेत. कळंब तालुक्यातील खोंदला गावात वीज पडून एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मराठवाड्यात पावसाची हजेरी उस्मानाबादसह मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. नांदेडमधल्या अनेक ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडला. लातूरमध्येही पावसाने दहा मिनिटे हजेरी लावली. वादळी वारा आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यात एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी विज पडून दोन जणांचे मृत्यु तर दोन महिला जखमी झाल्या आहेत. रंगनाथ पांडुरंग सोनवणे हे वीट भट्टी मालक काम करीत असताना अचानक वीज अंगावर पडुन जागीच ठार झाले. तर त्यांची बायको आणि महिला कामगार जखमी झाले आहेत. दुसरी घटना तेलवाडी येथे घडली. मेंढी चारत असणाऱ्या अरुणा दत्तू रूपणार या महिलेचा वीज पडून जागीच मृत्यु झाला. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगरमध्येही पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान पूर्व मान्सून पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.