Nandurbar Rain : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यातील काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातही तब्बल  27 दिवसानंतर पावसानं हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनानंतर एका शेतकरी कुटुंबानं ढोल ताशांच्या गडरात पावसात नाचून आनंद व्यक्त केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.    


27 दिवसानंतर पावसाची हजेरी


नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 27 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळं शेतकरी चिंतेत होते. कारण खरीपाची पिकं वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. पिकांसाठी पाण्याची मोठी गरज होती. त्यामुळं शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर पावसानं हजेरी लावल्यामुळं बळीराजा आनंदी झाला आहे. पावसासाठी शेतकऱ्यांकडून देवाकडे साकडं घालण्यात आलं होतं. यातच आज नंदुरबार जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळं एका शेतकरी कुटुंबानं ढोल ताशांच्या गजरात नाचून आपला आनंद व्यक्त केला आहे. या आनंद साजरा करण्याऱ्या शेतकरी कुटुंबाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 


भात पीक उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा 


नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून पावसानं दडी मारली होती. हवामान खात्यानं येत्या तीन दिवसात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार नवापूर शहर आणि परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील भात पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. तर दुसरीकडे या पावसामुळं पिकांना जीवदान मिळाले असले तरी अजून दोन-तीन दिवस पाऊस असाच सुरू राहिला तर परिसरातील पिण्याच्या पाण्याची ही समस्या मार्गी लागणार आहे. मात्र, रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. समाधानकारक पावसामुळं शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.


वाशिम जिल्ह्यातही पावसाची जोरदार हजेरी


हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं खरिपाची पीकं संकटात आली आहेत. पाऊस बरसल्यानं सुकणाऱ्या पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. तर पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. राज्यात नंदुरबारसह वाशिम, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 


मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पाऊस


विश्रांतीनंतर पुन्हा मुंबईसह परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सखल भागात पाणा साचायला सुरुवात झाली आहे. तसेच ठाणे परिसरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. यामुळं संथ गतीनं वाहतूक सुरु आहे. तर दुसरीकडं पालघर जिल्ह्यातही सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik : नाशिक जिल्ह्यातील 92 पैकी 55 मंडळात 21 दिवसांपासून पाऊस नाही, 40 टक्के पाऊस कमी, शेतीपिकांना मोठा फटका