मुंबई : राज्यभरात सर्वदूर पावसाने धुमाकूळ घातला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत अक्षरश: मुसळधार पाऊस कोसळत आहे.
नाशिकमध्ये जोरदार
सध्या नाशकात पावसाने विश्रांती घेतली असली तरी गेले सहा दिवस पडत असलेल्या पावसामुळे नाशिकमधलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये एकादिवशी सर्वाधिक पाऊस पडल्याचा विक्रम काल नोंदवला.
नाशिकमध्ये नऊ तासात तब्बल 991 मिमी पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसानं गोदावरी नदीला यंदा पहिल्यांदाच पूर आला. त्यामुळे शहरात पाणी शिरलं.
काल दुपारी पंचवटी परिसरातून एक चारचाकी आणि दोन दुचाकी गाड्या वाहून गेल्या आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रामकुंडवरचा रामसेतू पूलही पाण्याखाली गेला. बाणगंगा नदीलाही पूर आला असून दारणा, भावली, कश्यपी, धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.
रामकुंडावर अडकलेल्या दोन भाविकांची अग्निशमन विभागाने सुटका केली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
डागडुजीसाठी माळशेज घाट बंद
माळशेज घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडतयात. त्या पार्श्वभूमीवर येत्या पाच दिवस माळशेज घाट बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही माळशेज मार्गे कुठे जाण्याचा प्लान करत असाल तर तो रद्द करा. आज सकाळी माळशेज घाटात दरड कोसळली त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. सातत्यानं दरड कोसळण्याच्या घटना बघता माळशेज घाट पाच दिवस बंद ठेवला जाणार आहे. या काळात निसरड्या दरड हटवण्यात येतील. त्यानंतर मात्र मार्ग सुरळीत राहावा अशी अपेक्षा आहे.
विदर्भात मुसळधार
विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला आहे. गडचिरोलीच्या पर्लकोटा नदीला पूर येऊन तब्बल २०० गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे अनेक गावातला विद्युत पुरवठ्याबरोबरच मोबाईल सेवाही ठप्प पडली. यवतमाळमध्येही रात्रीत झालेल्या संततधारेनं सायखेडा इथला मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे.
सध्या १५० क्युबिक मीटर प्रति सेंकड पाण्याचा विसर्ग याठिकाणी होतो. दरम्यान, नदी आणि नाल्याकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला गेला.
चंद्रपुरात पावसाचा कहर
तिकडे चंद्रपुरातही पावसाचा कहर बघायला मिळतोय. काल झालेल्या पावसामुळे 6 जणांचा जीव गेला. बल्लारपूर तालुक्यातील किन्ही नाल्याला पूर आला आहे. त्यात इंडिका वाहून गेल्यानं चौघांना जलसमाधी मिळाली. एका कॉन्व्हेन्ट संचालकांसह ३ शिक्षकांचा यात मृत्यू झाला.
यामध्ये संचालक सचिन गोविंदवार, करण कावळे, संध्या दिनेश राजूरकर, पूजा राजूरकर यांचा समावेश आहे. तर तिकडे इरई धरणाच्या खड्ड्यात बुडबन दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. किशोर पोरसे आणि अकाश मोरे अशी या तरुणांची नावं आहेत.
कोकणात संततधार
आज सकाळपासून कोकणातील अनेक भागात पावसाची संततधार सुरु राहिली. यामुळे लांजा, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर भागातील पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली. राजापूर शहरपरिसरात अनेक सखल भागात पुराचं पाणी शिरलंय.
संगमेश्वरमध्ये ही आज तीच स्थिति होती .पावसाचा जोर असाच कायम राहिला तर राजापुरच्या जवाहर चौक परिसरात पुराचं शिरण्याची शक्यता आहे. कोकणातील सर्वच भागात मुसळधार पाऊस असल्यानं त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जातेय.
बेळगावात धुवाँधार
बेळगाव आणि परिसरात शनिवारी रात्री पावसाचं पाणी शिरल्याने अनेक घरं आणि दुकानांचं मोठं नुकसानं झालं. मराठा कॉलनी, शास्त्री नगर भागात अक्षरश: तळं तयार झालंय. त्यामुळे नागरिकांनी घरात बसून राहणच पसंत केलं आहे.
महानगरपालिकेचं आपत्कालीन पथक शहरातून पाण्याचा निचरा करण्याच्या कामात लागलंय. मात्र या मुसळधार पावसाचा या भागातील रुग्णालयांना फटका बसलाय. वीजपुरवठा खंडीत झाल्याने रुग्णांवर उपचाक करताना अडचणी येत आहेत.
कोल्हापुरात पंचगेगेने धोक्याची पातळी ओलांडली
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर सलग तिसऱ्या दिवशी पाऊस कोसळतोय. आत्तापर्यंत झालेल्या पावसानंन 32 बंधारे पाण्याखाली गेलेत, तर पंचगंगा नदीच्या पातळीत देखील कमालीची वाढ झाली आहे. सोबतच या तुफान पावसामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी 18 घरांची पडझड झाली आहे.
पुणे परिसरात जोरदार
पुणे आणि परिसरात पावसाने दमदार बॅटिंग केली. बहुतेक तालुक्याला पावसाने झोडपलं आहे. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे.
साताऱ्याला झोडपलं
कोयना धरणात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे 24 तासात धरणात तब्बल 5 टीएमसी पाणी वाढलंय. महाबळेश्वर आणि परिसरात झालेल्या पावसामुळे हा दिलासा मिळालाय. आज पाच टीएमसी पाणीसाठा वाढल्यानं कोयना धरणात एकूण 30.27 टीएमसी पाणीसाठा साठला आहे.
मराठवाड्यातही संततधार
दुष्काळी मराठवाड्यात पावसाने सर्वत्र पाणी -पाणी करुन सोडलं आहे. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातुर यासह अनेक जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस आहे.