मुंबई : मान्सूनने तळकोकणात वर्दी लावल्यामुळे सिंदुधुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले भागात आज सकाळपासून पावसाच्या रिमझिम सरी बरसतायेत.


सिंधुदुर्गाच्या वेंगुर्लामध्ये हजेरी लावल्यानंतर राज्यात मान्सूनचा प्रवास सुरू झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिलीय. सिंधुदुर्ग पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यातही सकाळी पावसाच आगमन झालं होतं, मात्र सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.

रत्नागिरीतील राजापूर, लांजामध्येही पावसाने सकाळपासून हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवाही निर्माण झाला आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची हजेरी

मुंबई, कोकणासोबत पावसाचा जोर विदर्भातही पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यात काल रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. एका रात्रीत वाशिममध्ये 24 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी रात्रभर पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. शिवाय उन्हाने लाहीलाही झालेल्या विदर्भाला दिलासा मिळाला आहे.

उत्तर महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावली. काल अनेक ठिकाणी पाऊस बरसला. काही ठिकाणी सकाळी मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. तर दुपार नंतर अंबासन, मनमाड, येवल्याच्या उत्तर पूर्व भागात जोरदार पाऊस बरसल्याने नाल्यांना चांगलं पाणी वाहू लागलं.

औरंगाबाद जिल्यात गेल्या तीन दिवसापासून पाऊस हजेरी लावत आहे. आज दुपारी दोन वाजल्यापासून शहरात पावसाची रिपरिप सुरु आहे. या पावसामुळे लोकांनी आपल्या घरात अडकवलेल्या छत्र्या बाहेर काढल्या आहेत तर काहींनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. तर तिकडे लातूरमध्येही पावसाने हजेरी लावली.