कोल्हापूर : सरकार स्थिर असल्यामुळे चर्चेसाठी मातोश्रीवर जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मध्यावधी निवडणुकांची केवळ चर्चा असून 200 संख्याबळ असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही पाटील म्हणाले.


शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा धुसफूस सुरु झाली असून, सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून मातोश्रीवर जाणार असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं.

सरकार स्थिर असल्यामुळे युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर जाण्याचा प्रश्नच येत नाही. मध्यावधी निवडणुकीचीही नुसतीच चर्चा असून 200 आमदारांचं संख्याबळ असताना काँग्रस राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.
राणेंच्या प्रवेशाच्या फक्त चर्चा

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयामुळे पक्षात येण्याची अनेकांची तयारी आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या नावाची फक्त चर्चा आहे. राणे हे सगळ्याच पक्षांना हवंसं व्यक्तिमत्व असल्याचं सांगत हा मुद्दा प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक पातळीवर चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं. मोदींवर विश्वास ठेवून पक्षात येणाऱ्यांचं स्वागतच असल्याचंही ते म्हणाले.