रायगड: किल्ले रायगडावरील मेघडंबरीत बसवण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील तलवारीचा काही भाग चोरीला गेला आहे. यासंदर्भात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे.
किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तलवारीचा भाग चोरीला गेला असून, या प्रकरणी महाड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, त्या राजदरबारातील मेघडंबरीमधील 2009 साली कोल्हापूर येथील छत्रपती संभाजीराजे यांनी ब्रांज धातूपासून खास बनविलेला पूर्णाकृती पुतळा विधीवतपणे स्थापन केला होता. शिवरायांचा हा पुर्णकृती पुतळा सतीश घारगे या शिल्पकाराने तयार केला होता.
शनिवारी सकाळी महाराजांच्या पुतळ्यावरील 40 इंच लांबीच्या तलवारीपैकी सात ते आठ इंच लांबीचा भाग चोरीला गेल्याचे आढळून आले. यानंतर याची माहिती पुरातत्त्व विभागाने तातडीने महाड पोलिसांना दिली.
यानंतर पुरातत्त्व खात्याचे संदीप ओकेकर यांच्या फिर्यादीवरुन महाड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत पोलीस अधिक तपास करत असून कोणत्याही प्रकारच्या आफवा पसरवू नये, असे आवाहन महाड पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, महाराजांच्या पुतळ्याजवळ पहारेकरी आणि सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी केली असून, रात्रीपर्यंत नवी तलवार बसवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.