अहमदनगर : अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. भिवंडी येथील प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन यांच्या माहितीनुसार अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरु होती. या कारवाईत पाच कत्तलखान्यांमधून जवळपास 62 लाख रुपयांच्या 31 हजार किलो गोवंशाच्या मांसासह पोलिसांनी 1 कोटी 4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईनंतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून अवघ्या राज्याचे लक्ष पुन्हा एकदा संगमनेरवर खिळले आहे. 


2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती दिनी संगमनेर शहरात रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सुरु झालेली कारवाई आज सकाळपर्यंत सुरु होती. या कारवाई दरम्यान कत्तलखान्यांच्या परिसरात वारंवार तणावही निर्माण होत होता. काही टवाळखोरांनी पोलीस कारवाईत अडथळा निर्माण करण्यासाठी दगडे फेकून रस्त्यावरील पथदिवे फोडण्याच्याही घटना समोर आल्या. मात्र पोलिसांनी त्याला न जुमानता जमाव पांगवला व आपली कारवाई सुरुच ठेवली. गेल्या काही वर्षात झालेल्या सातत्याच्या कारवायात यातील बहुतेक कत्तलखाने बंद झालेली असून सध्या वरील पाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करुन त्यांचे मांस मुंबई, गुलबर्गा (कर्नाटक), मालेगाव व औरंगाबाद सारख्या ठिकाणी गोवंशाचे मांस पुरवले जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. या  छापा प्रकरणाची गोपनीयता बाळगीत ही कारवाई पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यानंतरची राज्यातील सर्वात मोठी कारवाई संगमनेर शहरात झाली आहे.


या प्रकरणी सहाय्यक फौजदार रफियोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरुन वरील पाच जणांवर भा.द.वी कलम 269,429, महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्याचे कलम 5(अ), 1/9,5 (क),9(अ) व प्राण्यांना निर्दयीपणाने वागणूक देण्यास प्रतिबंध करणार्‍या कायद्याचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.