शिर्डी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची 27 एप्रिलला अहमदनगरच्या संगमनेरमध्ये प्रचारसभा पार पाडली. यावेळी उशिर झाल्याने राहुल गांधींनी संगमनेर मुक्काम ठोकला. त्यावेळी राहुल गांधींनी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या घरी अनपेक्षित भेट दिली. त्यावेळी सत्यजित तांबेंची मोठी तारांबळ उडाली.


सत्यजित तांबे यांनीही मग राहुल गांधी यांचा उत्तम पाहुणचार केला. राहुल गांधींनी सोबत जास्तीचे कपडे आणले नसल्याने रात्रीच्या वेळी त्यांच्या मापाचे कपडे दुकानातून आणावे लागले. अंगावरचे कपडे रात्रीच धुवून सकाळी पुन्हा इस्त्री करुन घातले. यावेळी संपूर्ण तांबे कंटुबियांना राहुल गांधींच्या साधेपणाचा अनुभव आला.






राहुल गांधींना लहान मुलांबद्दल लळा असल्याचंही यावेळी दिसून आलं. सत्यजित तांबे यांच्या मुलीबरोबर राहुल गांधी मस्ती करत होते. सत्यजित तांबेंच्या मुलीच्या चपला खेळताना पडल्या, तर त्या राहुल गांधींनी स्वत:च उचलून बाजूला नेऊन ठेवल्या. जेवणात जे काही मराठी पद्धतीचं जेवण असेल तेच द्या, असा आग्रहही राहुल गांधींनी केला.


राहुल गांधींसोबतच्या यासर्व खास आठवणी व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून सत्यजित तांबे यांनी साठवून ठेवल्या आहे.