मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी हे 25 मे रोजी महाराष्ट्रात येणार आहेत. राहुल गांधी हे राजीव सातव यांच्या कुटुंबियांना भेटणार असल्याची माहिती आहे. हिंगोलीत कळमनुरी इथे येऊन राजीव सातव यांच्या कुटुंबियांचं सांत्वन राहुल गांधी करणार आहेत. राजीव सातव यांच्या निधनांनंतर पहिल्यांदाच राहुल गांधी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. राजीव सातव काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जायचे. 


राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला- राहुल गांधी


राजीव सातव यांचे निधन झाले यावर आजही विश्वास बसत नाही, त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला आहे तेवढाच आघात काँग्रेस पक्षावरही झाला आहे. राजीव यांची दोन कुटुंबं होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीवमध्ये एक चमक आहे हे पहिल्याच भेटीत दिसले होते, त्यांनी नेहमी पक्षासाठी उत्तम काम केले. राजकारणात त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. राजीव कधीच कोणाबद्दलही वाईट बोलत नसे. लोकसभेत काँग्रेस पक्षाते 45 सदस्य असताना ते 5-7 व्यक्तीचे काम एकटेच करत असत. राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा  भावना खासदार राहुल गांधी यांनी शोकसभेत व्यक्त केल्या होत्या. 


Rajiv Satav : पंचायत समिती सदस्य ते खासदार आणि काँग्रेसचे आश्वासक नेतृत्व...असा आहे राजीव सातव यांचा राजकीय प्रवास


काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे 16 मे रोजी निधन झालं. काही दिवसांपूर्वीच कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा राजीव सातव यांची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला होता आणि शरीरात या विषाणूचा संसर्ग झाला होता. पंचायत समिती सदस्य, आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. राजीव सातव यांचे निधन ही काँग्रेसची मोठी हानी आहे.


'राजीव सातवांच्या निधनानं चांगला सहकारी, मित्र, परिवारातील सदस्य गमावला', शोकसभेत राहुल, प्रियांका गांधी भावूक 


राजीव सातव यांचा जन्म 21 सप्टेंबर 1974 साली हिंगोली जिल्ह्यातील मसोड, तालुका कळमनुरी येथे झाला. त्यांच्या आई, रजनी सातव या शरद पवारांच्या मंत्रिमंडळातील मंत्री होत्या. राजीव सातव यांनी आपलं शिक्षण पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातून आणि आयएलएस लॉ कॉलेजमधून पूर्ण केलं. 2002 साली त्यांचा विवाह झाला  आणि सध्या त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.