फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी घणाघाती प्रहार केला आहे. मला तो उमेदवार मान्य नाही, म्हणून माझा भाजप उमेदवाराला विरोध आहे. दुसरी बाब मी शरद पवारांचा चाहता आहे. त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासोबत मी असले पाहिजे म्हणून मी त्यांच्यासोबत असल्याचे रघुनाथराजे निंबाळकर म्हणाले. 


सध्याचा खासदार स्वतःला पाणीदार खासदार म्हणतो


ते म्हणाले की, 50 ते 60 अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रत्येक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करणे सुरु आहे. नीरा देवधर धरण रामराजेंनी बांधून 60 ते 70 किमी पाणी रामराजेंनी आणलं आणि सध्याचा खासदार स्वतःला पाणीदार खासदार म्हणतो. हे क्रेडिट खाण्याचा प्रयत्न आहे. मंत्रालय माझ्या आजोबांनी बांधले, कोयना धरण माझ्या आजोबांनी बांधले, कोणी नाव तरी घेतं का? याची खंत वाटते. आता रामराजे यांच्याबाबत देखील हेच घडत आहे त्यामुळे मला भूमिका घ्यावी लागली. 


त्यांनी सांगितले की, मला घड्याळ्यापेक्षा तुतारी जास्त आवडली. घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांनी थांबलं. मात्र, तुतारी तू तू करत वाजली की अख्खा महाराष्ट्र गरजतो. तुतारी मला छान वाटली. पक्ष गेलं, चिन्ह गेलं परंतु दोन तासात तुतारी तळागाळात गेली. ठाकरेंना मशाल दिली. निवडणुक आयोगाने हे चांगलं काम केलं. राज्यात मशीन हॅक झाल्या नाहीत तर नक्कीच महाविकास आघाडीला चांगलं वातावरण असल्याचेही ते म्हणाले. 


रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमच्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही


रघुनाथराजे म्हणाले की, मालोजीराजे यांचे नातवंड आम्ही चार जण आहोत. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमचा काहीच संबंध नाही. सध्या जी क्लिप व्हायरल होते ती अत्यंत चुकीची आहे. इंग्लंडच्या राजाच्या वंशावळीत मी माझं नाव घुसवलं तर मी त्यांचा नातेवाईक कसा काय होईल? आमच्या आत्तापर्यंत 28 पिढ्या होऊन गेल्या. आमच्या या पिढीत कसलाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संबंध नाही. मी जी दाखवतो आहे ती वंशावळ सरकारने छापलेली आहे. सध्याचे खासदार सईबाई यांचे नातेवाईक असल्याचं दाखवून याचा गैरफायदा घेण्याचा प्रकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.


रामराजे यांच्यासंदर्भात कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न सुरु होता


एका महिलेला फोन करुन धमकी देण्यात येत होती की तू रामराजे यांचं नाव घे. त्यानंतरच तुझ्या नवऱ्याला जेलमधून बाहेर काढतो. हे काम सध्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहेत. जो व्यक्ती जेलमध्ये आहे त्याला भाजपने देखील दुर्लक्षित केलं आहे. विधानसभा निवडणुकीला त्या व्यक्तीला 70 हजार मतदान मिळालं होतं. त्या व्यक्तीवर अनेक केसेस दाखल केल्या आहेत. याच खासदाराने माझ्यावर 307 चा गुन्हा दाखल केला. आमचं कुटुंब सत्ताधारी पक्षात असून देखील माझ्यावर यांनी 307 गुन्हा दाखल केला. मला कुणीही मदत केली नाही. माझ्यावर तर आता ईडीची कारवाई होईल, मी घाबरत नाही मी जेलमध्ये जाऊन बसेन. 


माझा विरोध संबंधित उमेदवाराला आणि आमदार जयकुमार गोरेला 


तु्म्ही वेगळी भूमिका घेतली याचा फटका तुमच्या दोन भावांना बसेल असं वाटतं नाही का? असे विचारले असता मी माथेफिरु नाही. सध्या आमचं सगळं कुटुंब रस्त्यावर उतरुन प्रचार करत आहे. नक्कीच याला काही कारण असेल ना? असेही ते म्हणले. देवेंद्र फडणवीस चांगला माणूस आहे परंतु तो चुकीच्या माणसांच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.  माझा विरोध भाजपला नाही माझा विरोध संबंधित उमेदवाराला आणि आमदार जयकुमार गोरेला आहे. एका भावाने ठरवले आहे की तुतारी वाजवायची आणि दुसऱ्या दोन भावाने शांत राहून मदत करायची. मी कायम तुतारी सोबत आहे. मी राजे गटांसोबत नाही. राजे गटाने मला खुशाल सगळ्या संस्थांवरुन काढून टाकावं. मात्र माझ्या आजोबांनी ज्या संस्था काढल्या आहेत. त्यावर मी हक्क सोडणार नाही. आजोबांनी स्थापन केलेल्या ट्रस्टच्या 17 हजार एकर जमीन आहेत. एका प्रायव्हेट फॅमिलीची ही संपत्ती आहे त्यामुळे माझा त्यात वाटा आहे. यावरुन मला काढायचा काहीच संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले. 


मी गरज पडल्यास तुतारी हातात घेऊन निवडणूक लढणार


मी राजे लावून फिराणारा तोतया राजे नाही. मी एका चांगल्या कुटुंबाचा सदस्य आहे. माझ्या आजोबांचा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यांना अनेक संघर्ष सहन करावा लागला. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की राजा हा प्रजेचा बाप असतो मालक नाही. माझ्या आजोबांनी स्पष्ट सांगितलं होतं की कुळ कायद्याच्या आधारे कुणाचं घर पाडू नका आणि जर पाडले तर मला परत तोंड दाखवू नका. मला मंत्री व्हायचं नाही आमदार व्हायचं नाही मला फक्त शरद पवारांची साथ द्यायची असल्याचे त्यांनी सांगितले.