सांगली : आज शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभे असताना, चर्चा मात्र स्वतःला शेतकरी नेते म्हणवणाऱ्या दोन नेत्यांच्या भांडणाच्या सुरु झाल्यात. कुत्र्याची कळवंडं लागावी तसे भांडण सुरुय, असे म्हणत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला.
रघुनाथदादा नेमकं काय म्हणाले?
“साखरेचा विषय, ऊसाचा भाव, शेतमालाचे भाव, कापसाची बोंडअळी, हे जे काही विषय आहेत, ते आम्ही कार्यकर्त्यांनी जनतेसमोर आणले होता. पण एका फटक्यात त्यांनी या चर्चा बाजूला पाडल्या. कुत्र्याची कळवंडं लागावी, तशाप्रकारे कळवंड करुन भांडण सुरु आहेत.”, अशी टीका रघुनाथदादांनी शेट्टी आणि खोतांवर केली.
“तुरीचे प्रश्न तसेचआहेत. तुरीचे गेल्या वर्षीचे पैसे अजून मिळत नाही. त्याबद्दल बोलायला कुणी तयार नाहीत. रोज डझनभर शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही. आणि चर्चा मात्र या दोघांच्या भांडणाच्या सुरु झाल्या. या चर्चा फक्त शेतकऱ्यांच्या समस्या बाजूला पडाव्या, यासाठी आहेत. या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्याचं काम यांच्या भांडणाने केले आहे.”, असा आरोपही रघुनाथदादांनी केला.
साखरेचे भाव कोसळल्याने साखर कारखानदारांनी 2500 रुपये इतकी पहिली उचल देण्याच्या घेतलेल्या निर्णयाला रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने देखीलल विरोध दर्शवला आहे. 2500 रुपये देण्यास आमचा विरोध असून 3000 रुपये बिले दिले गेले पाहिजे. पण हे कायदा मोडण्याचे लोक काम करत आहेत, असा आरोपही रघुनाथदादांनी केला.
शेतकऱ्यांना जर 3000 रुपयांचा दर मिळाला नाही, तर आम्ही साखर बाहेर पडू देणार नाही, असेही पाटील म्हणले.