सिंदखेड राजा: ‘शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेने दाखविलेला कळवळा शेवटी ढोंगी सिद्ध झाला आहे. कर्जमाफी मिळेस्तोवर शिवसेना एनडीएच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकेल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्याऐवजी उद्धव ठाकरे पंतप्रधानांसोबत स्नेहभोजन घेताना दिसून आल्याने मोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीच्या मागणीला ‘जय महाराष्ट्र’ केल्याचे दिसून येते.’ अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्षांनी काढलेल्या संयुक्त संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करताना ते बोलत होते. विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते माजी मंत्री आ. जयंत पाटील आदी उपस्थित होते.
‘शेतकरी पित्याकडे लग्नाला पैसा नाहीत म्हणून लातूर जिल्ह्याच्या भिसे वाघोली या गावातील 21 वर्षीय तरूणीने आत्महत्या करण्याच्या घटनेसाठी त्यांनी सरकारला जाब विचारला. रोज 9-10 शेतकरी आत्महत्या करीत आहेत, त्यांची मुले-बाळेही विहिरीत उड्या घेत आहेत. तरीही राज्याच्या मुर्दाड सरकारला जाग येत नाही, या इतके दुसरे दुर्दैव काय असू शकते?’ असा संतप्त सवाल विखे-पाटील यांनी विचारला.
‘भाजप-शिवसेनेने सरकारने प्रत्येक कामाचा इव्हेंट केला आहे. सरकारचे निर्णय, घोषणा, कारभार आदी सर्व बाबी इव्हेंट मॅनेजमेंटने सुरू आहेत. भाजपचा सहकारी असलेल्या शिवसेनेने तर आपल्या विदुषकी चाळ्यांनी राज्याचे मनोरंजन सुरू केले आहे. कधी ते कर्जमाफीच्या मुद्यावर बहिष्कार टाकतात, मध्येच दिल्लीला जाऊन जेटलींना भेटून येतात, नंतर अर्थसंकल्पाच्या कामकाजात सहभागी होतात, कर्जमाफी विसरून मंत्रिमंडळ फेरबदलांमध्ये मश्गूल होतात, नंतर पुन्हा मंत्र्यांना घाबरून फेरबदल थांबवतात, पंतप्रधानांसोबत बैठकीसाठी दिल्लीला जातात, कधी मोदींना शिव्या देतात तर कधी ‘मेरे नरेंद्र भाई’ म्हणत त्यांच्याशी भाऊबंदकी जोडतात. अशी परस्परविरोधी भूमिका घेत शिवसेनेने महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमालाही मनोरंजनात मागे टाकलं आहे.’ बोचरी टीका विखे पाटील यांनी केली.