Gautami Patil Video Viral : नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. तिच्या डान्स स्टाईलमुळे आणि तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या गोंधळांमुळे गौतमी पाटील (Gautami patil) महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. तिच्या कार्यक्रमात तरुणांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला आहे. हा सगळा प्रकार घडला आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवाडी गावात.


पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवाडी गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नेहमी प्रमाणे प्रचंड प्रमाणात गर्दी होती. तरुणांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न देखील केला. कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा यासाठी गावातील महिलांवर हातात काठ्या घेऊन उभे राहण्याची वेळ आली. या सगळ्या राड्यामुळे गौतमी पाटील आणि आयोजकांना हा कार्यक्रम थांबवावा लागला. 


काही वेळाने हा राडा थांबला आणि गौतमी पाटीलने पून्हा कार्यक्रमाला सुरुवात केली. आजपर्यंत ज्या गावात गौतमी पाटीलचे लावणीचे किंवा नृत्याचे कार्यक्रम झाले. त्यापैकी अनेक कार्यक्रम गौतमीच्या नृत्यामुळे नाही तर तिच्या कार्यक्रमात झालेल्या गर्दी आणि गोंधळामुळे गाजले. या कार्यक्रमात देखील तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र काहीही अनुचित प्रकार घडला नसल्याची आयोजकांनी माहिती घेतली आणि कार्यक्रम पुन्हा सुरु केला. 


गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात गोंधळ?


गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. तिच्या डान्सवर महाराष्ट्रातून टीका केली जात होती. तिच्या नृत्यात अश्लीलता असल्याची टीका करत तिने डान्स करणं बंद करावं अशी मागणी काही मंडळींनी केली होती. सोलापुरात गौतमी पाटीलच्या नृत्याचा तडका पाहायला मिळाला होता. त्या कार्यक्रमाला देखील तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  सोलापुरात देखील गौतमीचा डान्स पाहण्यासाठी तरुणांपासून वयोवृद्धांनी गर्दी केली होती. गौतमी पाटीलच्या डान्सवर बंदी घालण्यात यावी या मागणीनंतर तिचा इंदापूर तालुक्यातील निमगावातील कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.  


कार्यक्रमांना विरोध असून गर्दी मात्र कायम!
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला अनेक ठिकाणी विरोध केला जातो. गोंधळ निर्माण होत असल्याने आणि लावणीचा दर्जा घसरवत असल्याने तिचे कार्यक्रम बंद करा, अशी मागणी अनेक लावणीप्रेमींनी केली होती. त्यानंतरही तिचे कार्यक्रम सुरळीत सुरु आहेत आणि महत्वाचं म्हणजे तिच्या कार्यक्रमात तुफान गर्दी देखील बघायला मिळत आहे.