सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठात विद्यार्थ्यांचे गुण बेकायदेशीररित्या वाढवल्याप्रकरणी विद्यापीठाच्या परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाच्या तत्कालीन संचालकासह चौघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांचे गुण हे बेकायदेशीररित्या वाढवल्याप्रकरणी विद्यापीठातर्फे 25 डिसेंबर 2019 रोजी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण तांत्रिक असल्यानं त्याचा तपास पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सायबर पोलिसांनी केलेल्या या तपासात चौघांविरुद्ध सबळ पुरावे आढल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.


सोलापुरातील एका फार्मसी महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत फेरफार करुन गुणांत वाढ करण्यात आली होती. यामध्ये कुलगुरुंच्या आयडीचा वापर करत गुण वाढविल्याचा आरोप करण्यात आला. विद्यापीठानं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन कमिटी देखील गठीत केली होती. या कमिटीच्या अहवालातून कुलगुरुंच्या नावाने बनावट आयडी आणि पासवर्ड तयार केल्याचं देखील समोर आलं होतं. त्यामुळे हा प्रकार कोणी केला याचा तपास करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला.


तंत्रज्ञानाच्या आधारे तपास करत पोलीस निरीक्षक बजंरग साळुंखे यांच्या पथकाने सबळ पुरावे गोळा केले. यामध्ये परीक्षा आणि मुल्यमापन मंडाळाचे तत्कालीन संचालक श्रींकात कोकरे, तत्कालीन यंत्रणा विश्लेषक प्रशांत चोरमले, ई-सुविधा समन्वयक हसन शेख, प्रोग्रामर प्रवीण गायकवाड या चौघांना जवळपास एक वर्षांनंतर अटक करण्यात आली. अटक केलेल्या चारही आरोपींना न्यायलयासमोर उभं केलं असता त्यांना 22 जानेवरीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


काय आहे प्रकरण?


कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडे परीक्षा मंडळाच्या संचालक पदाचा प्रभारी पदभार होता. त्यामुळे एमकेसीएलकडून त्यांना लॉगीन आयडी आणि पासवर्ड देण्यात आला होता. या पदावर डॉ. श्रीकांत कोकरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे एमकेसीएलकडून त्यांना देखील नवीन आयडी आणि पासवर्ड देण्यात आले. मात्र कोकरे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी कुलगुरुंच्या आयडीचा वापर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत फेरफार करण्यासाठी वापरल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. एका अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण वाढवल्याचं प्रकरण तक्रारीच्या स्वरुपात विद्यापीठाला प्राप्त झालं होतं. मात्र प्राथमिक तपासात आणखी काही विद्यार्थ्यांचे गुण वाढवल्याची माहिती सुत्रांमार्फत प्राप्त झाली आहे. यासाठी हजारो रुपये हे आरोपी घेत असल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे. तत्कालीन वरीष्ठ अधिकाऱ्यांसह चौघांविरुद्ध ही कारवाई झाल्याने आणखी या प्रकरणात कोणाकोणाची नावं समोर येतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सोबतच ज्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवण्यात आले आहेत, त्यांच्या विरोधात कोणती कारवाई करण्यात येते का हे पाहणं देखील महत्वाचे आहे.