लातूर : झटपट पैसे कमवण्यासाठी पुण्यात उबर टॅक्सीचालकाची हत्या करुन टॅक्सी विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यात टॅक्सी चोरल्यानंतर चोरट्यांनी लातूर गाठलं, मात्र पोलिसांनी दोघांना गजाआड केलं.

पुण्यातून विजय देवराव कापसे या चालकाची उबर टॅक्सी भाडयाने घेऊन मज्जू अमीन शेख आणि समीर शेख हे दोघं सासवडला आले. टॅक्सीचालक विजयची हत्या केलानंतर टॅक्सी घेऊन ते लातूर शहरात आले. तिथे ही चोरीची टॅक्सी विकण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला.

लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेला याची माहिती मिळताच त्यांनी माग काढला चौकशीसाठी दोघा तरुणांना ताब्यात घेतलं. अखेर दोघांनीही हत्या केल्याची कबुली दिली. लातूर पोलिसांनी पुणे पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर स्थानिक पोलिस घटनास्थळी गेले. तिथे विजयचा मृतदेह आढळला.

कर्ज फेडून झटपट पैसे कमवण्यासाठी आपण हा मार्ग निवडल्याचं आरोपींनी सांगितलं. सासवड पोलिसांनी टॅक्सी ताब्यात घेऊन आरोपींची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. सासवड पोलिस पुढील तपास करत आहेत.