पुणे: हडपसरमधील बेपत्ता विद्यार्थीनी प्रकरणात ट्विस्ट आला आहे. कारण कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनीनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर, या मुली आता स्वत:च कंटाळा आल्याने फिरायला गेल्याचं उघड झालं आहे. तसंच या मुली तुळजापूर इथं सुरक्षीत असल्याचंही समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
हडपसर येथील एका महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनी कॉलेजला जातो असं सांगून मंगळवारी सकाळी घरातून बाहेर पडल्या. मात्र त्या घरी न परतल्याने या विद्यार्थिनींच्या पालकांनी हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन घेतला.
या तीनही मुली गोंधळेनगर, हडपसर, आणि वडकी इथं राहणाऱ्या आहेत.
कॉलेजला गेलेल्या मुली घरी न परतल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक, मैत्रिणींकडे चौकशी केली. मात्र त्यांच्याबाबात कोणाकडेही माहिती मिळाली नाही. रात्र झाली तरी मुली घरी परतल्याच नाही. तसंच या मुली कॉलेजला आल्याच नसल्याचंही समजलं.
त्यामुळे चितांग्रस्त पालक आणि नातेवाईकांनी हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली.पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मुलींकडील मोबाईलवर संपर्क साधला असता, मोबाईल फोन बंद होते.
कसा लागला शोध?
या तीनही मुली कॉलेज परिसरातील एका कॉपीशॉपमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत एक मुलगा होता. पोलिसांनी संबंधित कॉपीशॉपचे सीसीटीव्ही तपासून आधी त्या मुलाचा शोध घेतला. त्या मुलाकडे चौकशी केली असता, त्या तीन मुली तुळजापूरला फिरायला जाणार आहेत, असं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं, अशी माहिती मुलाने दिली.
त्यानंतर हडपसर पोलिसांनी तुळजापूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेबाबतची माहिती दिली. या तीनही मुली मंगळवारी रात्री एका हॉटेलवर गेल्या. त्याचवेळी तुळजापूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
कंटाळा आल्याने न सांगताच फिरायला गेल्याचं या मुलींनी सांगितलं. सध्या हडपसर पोलिस तुळजापुरात दाखल झाले आहेत.