पुणे: शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे अजित पवार गटासोबत असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केला होता. त्यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका बदलली का अशी चर्चा सुरू झाली. त्यावर आता अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी दुसऱ्या दिवसापासून शरद पवारांच्या सोबत आहे, भूमिका बदलली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी अमोल कोल्हे हे आपल्यासोबत असल्याचा दावा केला होता. तशा आशयाचं प्रतिज्ञापत्रक अजित पवारांना कोल्हे यांनी दिलं असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवारांसोबतच असल्याचं स्पष्ट केलं आहे. 


काय म्हणाले अमोल कोल्हे? 


शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी मी शरद पवार साहेबांसोबत असल्याचं जाहीर केलं आहे. आज ही मी त्यांच्यासोबत आहे. निवडणूक आयोगाला लिहलेल्या प्रतिज्ञापत्रातही मी पवार साहेबांसोबत असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळं यावर अधिकचं भाष्य करण्याची गरज मला तरी वाटत नाही. मी भूमिका बदलली नाही. 


काय म्हणाले सुनील तटकरे? 


पक्षांतर बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात आम्ही पीटीशन दाखल केलं आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही केलीय. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आम्हाला समर्थन दिलं आहे. त्यांनी अजित पवारांना पाठिंबा असल्याचं प्रतिज्ञापत्र दिलं आहे. त्यामुळं ते आमच्या सोबत आहेत असं आम्ही मानतो.


राज्यातली जनता अजित पवारांसोबत


सुनील तटकरे म्हणाले की, 2 जुलैला आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. नागालँड, झारखंड येथील आमदारांनी देखील समर्थन दिलं आहे. आम्ही राज्यभर दौरा सुरू करत आहोत. पहिला दौरा विदर्भातून असेल. त्यानंतर कोकण पश्चिम महाराष्ट्र दौरा असेल. राज्यातील जनता अजित पवार यानी घेतलेल्या निर्णयासोबत आहे. 


संसदरत्न नेहमी अदृश्य शक्ती असा सातत्यानं उल्लेख करत असतात. सर्वोच्च न्यायालाने दिलेला अलीकडच्या काळातील निर्णय याचा आधार घेऊन आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही निर्णय घेतला आहे असं सुनील तटकरे म्हणाले.


ही बातमी वाचा: