पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाबाबत सध्या सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचं वातावरण आहे.


दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांबाबत वेगवेगळे मेसेज फिरत आहेत. यामध्ये बारावीचा निकाल 25 मे तर दहावीचा निकाल 30 मे रोजी जाहीर होणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु या निव्वळ अफवा असल्याचं बोर्डाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

विद्यार्थी-पालक संभ्रमात
मागील वर्षी बारावीचा निकाल 25 मे रोजी जाहीर झाला होता. त्यामुळे काहींनी यंदाचा निकालही 25 मे रोजी जाहीर होणार असल्याचा मेसेज व्हायरल केला. परिणामी विद्यार्थीही संभ्रमात पडले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका!
मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या निकालाच्या तारखा अधिकृत नाहीत. बोर्डाने निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन बोर्डातर्फे करण्यात आलं आहे.

बारावीचा निकाल कधी?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या आठवड्यात बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करेल. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. तसंच दहावीचा निकालही याचदरम्यान लागेल, असं बोर्डाच्या सुत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान, बोर्डाने बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्यानंतर याबाबतचे सर्व अपडेट्स एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवेल.