मुंबई : पनवेल, भिवंडी आणि मालेगाव या तिन्ही महापालिकांच्या निवडणुकांची तयारी पूर्ण झाली आहे. तिन्ही महापालिकांसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान सुरु राहील.
भिवंडी- निजामपूर, मालेगाव आणि पनवेल महानगरपालिका, धारणी पंचायत समिती, नागभीड नगरपरिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक, तसंच सात नगरपरिषदांतील 11 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे. तिन्ही महानगरपालिकेच्या एकूण 252 जागांसाठी 1 हजार 251 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण 12 लाख 96 हजार 26 मतदारांसाठी 1 हजार 730 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदार शेकडो उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद करणार आहेत. तिन्ही शहरांमध्ये मतदार केंद्रावर ईव्हीएम पोहोचवण्यात आली आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. भिवंडी आणि मालेगाव महापालिकेतले काही प्रभाग हे संवेदनशील आहेत. त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांची बारीक नजर असणार आहे. पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे पनवेलची सत्ता कोण काबीज करतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. दुसरीकडे, मालेगावमध्ये सत्ता आली तर गोमांस बंदी उठवू असं आश्वासन भाजप उमेदवाराने दिलं आहे. भाजपने मालेगावात 27 मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर मुस्लिम बहुल असलेल्या भिवंडीतही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. जव्हार, श्रीवर्धन, चिपळूण, कसई-दोडामार्ग, धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु., औसा आणि अचलपूर या 7 नगरपरिषद/ नगरपंचायतींतील एकूण 11 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होईल.
महापालिका लोकसंख्या मतदार जागा उमेदवार मतदान केंद्रे कर्मचारी
पनवेल 5,09,901 4,25,453 78 418 570 3,242
भिवंडी-निजामपूर 7,09,665 4,79,253 90 460 644 4,028
मालेगाव 5,90,998 3,91,320 84 373 516 3,425