Pune Railway Police : रेल्वे स्थानकात प्रवाशांचे साहित्य, पिशव्या (Pune Railway Police)  तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्या लोहमार्ग पोलीस दलातील सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश लोहमार्ग पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. सहायक पोलीस फौजदार बाळू पाटोळे, हवालदार सुनील व्हटकर, प्रशांत डोईफोडे, जयंत रणदिवे, विशाल गोसावी, अमोल सोनवणे अशी निलंबत करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 

सहा पोलीस कर्मचारी पुणे रेल्वे स्थानकातील लोहमार्ग पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. 3 एप्रिल रोजी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडील साहित्य आणि पिशव्या तपासणीचे काम देण्यात आले होते. दुपारी पावणे एकच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या आवरात एका युवक आणि त्याच्या बरोबर असलेल्या मैत्रिणीला सहा पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवून चौकशी सुरु केली. त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. चौकशीत युवक आणि त्याच्या मैत्रिणीकडून पाच लाख रुपये घेण्यात आले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती मिळाली होती.

याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी आवहाल दिला असून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांनी गैरकृत्य केलं, तसेच पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेऊन त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

निलंबीत करण्यात आलेल्यांपैकी दोघांवर यापुर्वी बॅग तपासणी दरम्यानच जबरी चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. असे असताना त्यांची नेमणूक पुणे रेल्वे स्टेशनवर बॅगेची तपासणी केलीच कशी गेली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोहमार्ग पोलीस दलातील 6 पोलीस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे लोहमार्ग पोलीस स्टेशनमधील 4 तर पुणे लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेतील  दोन कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

रेल्वे स्थानकावर अनेकांनी फसवणूक केल्याचे प्रकार आपण पाहिले आहेतच. कधी सोनं चोरी तर कधी छेडा छेडी करण्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र या सगळ्य गुन्ह्यांना रोखण्यासाठी रेल्वे पोलीस तैनात करण्यात येतात. एखादी प्रवासी रेल्वे रुळावर पडली असल्यास त्यांना जीवनदान देण्यासाठी रेल्वे पोलीसच धावून येतात. या प्रकारच्या रेल्वे पोलिसांच्या अनेक  कौतुकास्पद कामगिरी आपण पाहिल्या आहेत. मात्र त्याच पोलिसांकडून जर अशी लूट होत असेल तर पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे या पोलिसांवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे.