मुंबई : राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी (Phone Tapping Case) पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (Ips Officer Rashmi Shukla) यांना क्लिन चिट देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुण्यात कार्यरत असताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , त्यावेळी भाजपमधे असलेले एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे फोन बेकायदेशीर रित्या खोट्या नावाने टॅप केल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. परंतु, या प्रकरणी आता पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. त्यामुळे या प्रकरणी त्यांची चौकशी बंद होण्याची शक्यता आहे.
राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात पुणे पोलिसांकडून घूमजाव होत असल्याचे चित्र आहे. कारण रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट देण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांकडून न्यायालयात या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुण्यात कार्यरत असताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , त्यावेळी भाजपमधे असलेले एकनाथ खडसे, अपक्ष आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे फोन बेकायदेशीर रित्या खोट्या नावाने टॅप केल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांकडून रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून घुमजाव करण्यात आलं असून रश्मी शुक्लांना क्लिन चिट देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या प्रकरणात पुणे पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय.
राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उच्चस्तरीय समितीने अहवाल सादर केला होता. त्यानंतर शुक्ला यांच्या विरोधात राज्य शासनाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. कारण केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांनी 18 ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे नेते मोहित कंबोजही (Mohit Kamboj) तिथे आले, त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली होती. शिवाय 23 सप्टेंबर रोजी रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती.