Lokmanya Bal Gangadhar Tilak :  भारतीय असंतोषाचे जनक समजले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर  टिळक यांचा आज स्मृतीदिन. लोकमान्य टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील 'लाल-बाल-पाल' या त्रयींमधील ते एक होते. भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या. लोकमान्य टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात. 

टिळकांचे बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरबिंदो घोष, व्ही.ओ. चिदंबरम पिल्लई आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्यासह अनेक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांशी घनिष्ट संबंध होते.

ब्रिटिशकाळात तुरुंगवासाची शिक्षा

लोकमान्य टिळकांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वायत्ततेसाठी लढा दिला. लोकमान्य टिळक हे जहालमतवादी नेते ओळखले जात असे. टिळक हे कट्टर राष्ट्रवादी परंतु सामाजिक परंपरावादी मानले जात होते. लोकमान्य टिळकांवर 1897 आणि 1908 मध्ये असे दोन वेळेस राजद्रोहाचे खटले चालवण्यात आले आहे. 1906 मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा आरोप लावून ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. 1908 मध्ये त्यांना 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मंडालेच्या या कारावासात त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. 1914 मध्ये कारावासातून सुटका झाली. 

परखड पत्रकार टिळक

चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने 1881 साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून प्रसिद्ध होत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली.

1881 ते 1920  या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी 513 अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', आदी अग्रलेख चांगलीच गाजली.  

पुण्यात 1897 मध्ये आलेली प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी ब्रिटीश सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली होती. उंदीर नष्ट करण्यासाठी सरकारने सक्तीची प्लेगविरोधी फवारणी सुरू केली. तेव्हा पुणेकरांनी याला विरोध केला. ब्रिटिशांनी लष्कराच्या मदतीने जबरदस्तीने घरात घुसून फवारणी करण्यास सुरुवात केली. प्रसंगी ब्रिटिशांकडून घरातील साहित्य, कपडे जाळली जात असे. त्यावर मोठा असंतोष निर्माण झाला होता. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा अग्रलेख लिहिला. यातून त्यांनी ब्रिटिश सरकारकडून सुरू असलेल्या बळजबरीच्या कारवाईला विरोध केला.  पुढे प्लेगच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या रँड या अधिकाऱ्याची चाफेकर बंधूंनी हत्या केली. चाफेकर बंधूंवर लोकमान्य टिळक यांचा प्रभाव असल्याचे म्हटले जात होते. 

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या प्रेरणेने, 1880 मध्ये गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर या त्यांच्या काही महाविद्यालयीन मित्रांसह त्यांनी माध्यमिक शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूलची सह-स्थापना केली. या शिक्षण संस्थेने पुण्यात महाविद्यालयेही सुरू केली. 

टिळक पुरोगामी की सनातनी 

लोकमान्य टिळकांच्या काही भूमिकांवरून गदारोळही झाला. टिळक हे सनातनी विचारांचे असल्याचाही दावा केला जातो.  कुणब्यांच्या (शेतकऱ्यांच्या) मुलांसाठी शिकणं, वाचणं, लिहिणं किंवा इतिहास, भूगोल आणि गणित हे त्यांच्या रोजच्या जगण्यात काहीच उपयोगाचे नाहीत." आणि "त्यातून त्यांचं चांगलं होण्यापेक्षा नुकसान जास्त होईल असा युक्तिवाद त्यांनी केला. ब्राह्मणेतरांना कारपेंटर, सुतारकाम, लोहारकाम, गवंडीकाम आणि शिंपी अशा गोष्टी शिकवल्या पाहिजेत. या गोष्टींचा त्यांच्या आयुष्यात जास्त स्थान आहे, असा मुद्याही ते मांडत असतं. त्याशिवाय, तत्कालीन काही समाजसुधारणेसाठी सुरू असलेल्या चळवळींनाही टिळकांनी विरोध केला असल्याचे म्हटले जाते. मात्र, त्याच वेळी लोकमान्य टिळक यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात आधीच्या भूमिकांमध्ये बदल केला असल्याचे दिसून येत असल्याचा मुद्दा अभ्यासक मांडतात. लखनऊ कराराच्या वेळी केलेल्या भाषणात टिळकांनी ब्रिटिशांच्या कूटनीतीवर बोट ठेवले. आपण मुसलमानांना केवळ वाटाच द्यायला तयार आहोत असे नसून हवे असेल तर सर्व कारभार त्यांच्याकडे सुपुर्द करायला आमची हरकत नाही. पहिल्यांदा ब्रिटिशांनी बाजूला व्हावे अशी स्पष्ट भूमिका मांडली. याच न्यायाने ब्रिटिशांनी येथील आदिवासी, दलित या समूहांकडे सत्तासंक्रमण केले तरी चालेल असेही बजावले, असे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी बीबीसी मराठीतील एका लेखात म्हटले. 1920च्या एप्रिल महिन्यात टिळकांनी काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाची घोषणा करून त्याचा जाहीरनामाही प्रकाशित केला. या जाहीरनाम्यात जातिभेद आणि लिंगभेदाविरुद्ध स्पष्ट भूमिका घेण्यात आली होती. विशिष्ट वयाखालील मुलामुलींना मोफत शिक्षण देण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन दिले होते. जाहीरनाम्याचा आराखडा टिळकांनी गांधी आणि जिना यांना दाखवला होता, असा दावाही डॉ. मोरे यांनी आपल्या लेखात केला.