Pune : सध्या राज्यात नामांतराच्या मुद्यावरुन चांगलच वातावरण गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर आता अशातच पिंपरी चिंचवड शहराचे नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. पिंपरी चिंचवडचे नाव बदलून राजमाता 'जिजाऊ नगर' करण्याची मागणी भाजपच्या विधान परिषदेतील आमदार ऊमा खापरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन

आज सभागृहात आमदार ऊमा खापरे यांनी पिंपरी-चिंचवडचे नामकरण जिजाऊ नगर करण्याचा विषय मांडला. पिंपरी- चिंचवडचे नामकरण जिजाऊ नगर करावे अशी मागणी याआधी भक्ति - शक्ती प्रतिष्ठानने देखील केली आहे. आमदार भमा खापरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले आहे. त्यामुळं आता भाजप आमदार उमा खापरे यांच्या मागणीवर सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 

पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद

पुण्यातील पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद पाहायला मिळाला. पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव यांच्या नावाने दिले पाहिजे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्यावर अनेकांनी यात उडी घेतली आहे. पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली होती. तर, पुणे शहरात 'पोस्टर वॉर' सुरू झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळाले. खासदार मेधा कुलकर्णी यांच्या या मागणीला उत्तर म्हणून शहरात ठिकठिकाणी खोचक बॅनर झळकले होते. या बॅनरमध्ये 'कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव 'मस्तानी पेठ' करा!' असा मजकूर होता. हे बॅनर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे लावण्यात आले होते. पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांचा मोठा इतिहास आहे. पुण्यातील शनिवार वाडा आजही पेशवे घराण्याच्या इतिहासाची साक्ष देतो. त्यामुळेच, पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगत पुणे जंक्शनचे नामांतर करण्याची मागणी खासदार यांनी केली आहे. श्रीमंत थोरले बाजीराव यांचे नाव देण्याची ही मागणी आहे. दरम्यान, विरोधकांनी या मुद्यावरुन जोरदार विरोध केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

पुणे रेल्वे स्थानकाचे नामांतरण करण्याचा प्रयत्न, परिसरात लागले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानकचे बॅनर, ब्राम्हण महासंघ आक्रमक