Pune Osho Ashram : ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या (Osho Ashram) विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले. काल ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माळ घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली. आज पुन्हा संन्याशी माळ घालून प्रवेशास बंदी केल्यानंतर 150 ते 200 ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश शुल्क न भरता संन्याशी माला घालून जाण्याचा निर्धार ओशो अनुयायांनी केला.


आश्रमाच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थापनाचा निषेध करणाऱ्या अनुयायांनी बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली. पोलिसांनी वारंवार समजूत काढूनही अनुयायी आपल्या मागण्यांवर ठाम होते. ओशो आश्रमाच्या बचावासाठी व्यवस्थापन विरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले आहे. या लाठीमारात अनेक अनुयायी गंभीर जखमी झाले आहेत.


गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने ओशो आश्रम प्रशासन आणि ओशो भक्तांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. ओशो आश्रम मधील जागा आणि भक्तांना माळा घालून आश्रमात आतमध्ये जाऊ दिलं जातं नव्हत. या विरोधात भक्तांकडून अनेक वेळा आंदोलन देखील करण्यात आलं होत. परंतु आज शेवटी आश्रमातील भक्तांनी आक्रमक पवित्रा घेत सुरक्षारक्षकांना डावलून थेट आश्रमात प्रवेश मिळवला आहे.


अनुयायांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे बराच वेळ ओशो आश्रमात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. खरंतर आचार्य रजनीश ओशो यांचा काल 70 वा संबोधी दिवस साजरा झाला. या निमित्ताने जगभरातून अडीच ते तीन हजार ओशो शिष्य हे कोरेगाव पार्क येथील आश्रम परिसरात दाखल झालेत इतके सगळे अनुयायी एकत्रित आल्याने त्यांनी आता ओशो आश्रमात सुरक्षारकांना डावलून  प्रवेश मिळवला आहे.


पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात


मागील अनेक दिवसांपासून ओशो अनुयायांचा वाद सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या ओशो आश्रमासमोर मोठ्या संख्येने अनुयायी जमत असतात. त्यांचा माळ घाल्यावरुन मोठा वाद आहे. त्यामुळे अनेकदा मोठी आंदोलनंही केली जातात. यावेळीदेखील हे अनुयायी प्रवेश नाकारल्याने आक्रमक झाले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला.  मात्र अनुयायी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहे आश्रमात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी मोठा गदारोळ झाला आणि परिसरात  मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.