Pune News : रोजच्या समस्यांनी ग्रासलेले पुणेकर महापालिकेसमोर आक्रमक (pune) झाले आहे. यावेळी कॉंग्रेसचे नेते अरविंद शिंदे आणि त्रस्त नागरिक आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. विविध मागण्यासाठी नागरिकांनी पालिकेला घेराव घातला होता.
नेमकं काय घडलं?
विविध मागण्यासाठी पुणेकर नागरिकांनी पालिकेला घेराव घालण्याचं ठरवलं होतं. त्यांच्याकडून विविध घोषणाबाजी करण्यात येत होती. याचवेळी कॉंग्रेसचे नेते आणि पदाधिकारी या नागरिकांना दिसले. त्यावेळी आंदोलन करत असलेल्या एका व्यक्तीने राजकारण्यांनी या ठिकाणी आपली पोळी भाजू नये, अशी घोषणा केली. त्यावेळी कॉंग्रेसचे नेते आणि पदाधिकाही काही प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काही वेळानंतर नागरिक आणि कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये हाणामारी झाली.
चलो पीएमसी या उपक्रमांतर्गत महापालिका आयुक्तांना जाब विचारायला पुणेकर पीएमसी एकत्र आले होते. पुणेकर नागरिकांच्या दैनंदिन समस्यांमध्ये ट्रॅफिक जॅम आणि त्यामुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण, अत्यंत तोकडी पार्किंग व्यवस्था, कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी, नदीमध्ये विना प्रक्रिया सोडले जाणारे सांडपाणी, त्या अनुषंगाने होणारे नदी प्रदूषण, तसेच नदीकाठ सुधारणा प्रकल्पाच्या नावाखाली नदीकाठची झाडे तोडणे, नदीमध्ये काँक्रिट टाकून रस्ते तयार करणे असे मानवी जीवनाला घातक ठरणारे प्रकल्प या सगळ्या मुद्द्यांवर जाब विचारण्यासाठी पुणेकर एकत्र आले होते.
या सर्व समस्यांकडे प्राधान्याने लक्ष द्यावं आणि त्यांचे निवारण करणे यासाठी महापालिकेकडे दहा हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद आहे आणि गेले वर्षभर अधिकार संपूर्णतः हाती असतानाही महानगरपालिका आयुक्त यांच्या देखरेखेखाली पुणेकरांच्या समस्या सुटलेल्या नाहीत किंबहुना त्यांच्यामध्ये वाढ झाली आहे, असं नागरिकांचं म्हणणं होतं. यासाठी नागरिकांना थेट विश्वासात घेऊन पुढील कृती कार्यक्रम ठरवणे आणि त्याच्या अंमलबजावणीचा अहवाल ठराविक कालावधीमध्ये नागरिकांना देणे महापालिकेवर बंधनकारक करणे या नागरिकांच्या मागण्या होत्या.
कचरा मुक्त पुणे, खड्डे मुक्त रस्ते, सुरळीत वाहतूक व्यवस्था, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त नदी, वाहनतळांची संपूर्ण शहरभर पुरेशी सुविधा, स्वच्छ, दर्जेदार आणि गतिमान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या पुणेकरांच्या मागण्यांसाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र नागरिकांमध्ये आणि कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या-