Pune News :  पुणे शहरात मागील काही वर्षांपासून विकास प्रगतीपथावर सुरु आहे. त्यासाठी पुण्यातील अनेक परिसरात कामं सुरु आहेत. मेट्रोपासून ते नवे पार्कपर्यंत सगळीच काम सध्या शहरात सुरु आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी तर होतेच आहे. मात्र याच कामात अडथळा ठरणाऱ्या झाडांची देखील कत्तल करण्य़ात येत आहे. त्यामुळे अनेक पर्यावरणप्रेमींनी शहरात सुरु असलेल्या अनेक प्रोजेक्ट्ससाठी विरोध केला आहे. त्यातच पुण्यात ऑक्सिजन पार्क उभारण्यात येत आहे. या पार्कसाठीदेखील अनेक झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. 


पुण्यातील वडगावशेरी-खराडी परिसरात 7.5 एकर जागेवर उभारण्यात येणार्‍या ऑक्सिजन पार्कच्या पायाभूत सुविधांच्या आड येणारी 59 झाडे सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तोडणार आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. झाडे तोडल्याने ऑक्सिजन पार्क तयार करण्यास कशी मदत होते, असा स्पष्ट प्रश्न उपस्थित केल्यानंतर पीएमसीच्या तज्ञ घटक समितीने या प्रकल्पाला हिरवा झेंडा दिला आहे. मात्र शक्य तितकी कमी झाडे तोडण्याची विनंती केली आहे.


पीएमसीच्या अहवालानुसार, 21 चिंचेची झाडे, 16 निलगिरी, 5 चेरी आणि 5 बाभूळाची झाडे, सर्व 4 ते 25 वर्षे वयोगटातील झाडे तोडली जाणार आहेत आणि 32 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. या निर्णयाला येथील रहिवासी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे.


नदी सुधारसाठी होणार 6000 झाडांची कत्तल
पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाचंदेखील काम सुरु झालं आहे. या प्रकल्पासाठीदेखील पुणे शहरातील झाडांची कत्तल होणार आहे. या प्रकल्पात होणाऱ्या झाडांच्या कत्तलीला अनेक राजकीय नेत्यांनीदेखील विरोध केला आहे. मनसे नेते वसंत मोरे, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीदेखील विरोध केला आहे. झाडांची कत्तल थांबवा, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.  नदी प्रकल्पांतर्गत एकूण 6 हजार वृक्ष तोडले जाणार असून मनसेने या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी वसंत मोरे यांनी आपल्या पत्रातून केली आहे. त्याबरोबरच पर्यायी उपाय शोधण्याची वसंत मोरे यांनी मागणीही केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेन या प्रकरणात उडी घेतल्याने पुण्यातील वृक्षतोडीप्रकरणी राजकारण तापणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याने मनसेचा कायम विरोध असणार असल्याचेही त्यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे.


ही बातमी वाचा: