अहमदनगर : आम आदमी पक्षाचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने राजधानी दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. केजरीवालांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन समाजसेवक अण्णा हजारेंनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. अरविंद केजरीवालांवरच भ्रष्टाचाराचा आरोप होणं दु:खद असल्याचं अण्णा हजारे म्हणाले आहेत.
केजरीवालांवरील आरोपावर प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे म्हणाले की, “दिल्लीतल्या भ्रष्टाचारविरोधात लढाईमुळे केजरीवाल मुख्यमंत्री झाले. पण आज त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होणं दु:खद आहे.”
अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’ नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून कोटी रुपये घेतल्याचा आरोप दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी आज केला. सत्येंद्र जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये दिल्याचं आपण स्वतः पाहिलं, असा सनसनाटी आरोप मिश्रा यांनी केला होता.
दरम्यान, केजरीवाल यांच्यावरील आरोपानंतर भाजपनंही त्यांना कोंडीत पकडण्याची तयारी सुरु केली आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केजरीवालांवरील आरोप म्हणजे त्यांच्या गुन्ह्यांची कबुली असल्याचं, म्हणलं आहे. तसेच केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा देऊन, कायदेशीर कारवाईला सामोरं जावं, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
तर काँग्रेसनंही केजरीवाल यांना लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच तसेच मंगळवारपासून यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवणार असल्याचं सांगितलं आहे.
संबंधित बातम्या
केजरीवालांनी सत्येंद्र जैनांकडून दोन कोटी घेतले : कपिल मिश्रा