पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मिसिंग लिंकची उभारणी करण्यात येत आहे. याचं 75 टक्के काम पूर्ण झालंय, त्यामुळं सप्टेंबर 2024मध्ये हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंनी केला आहे. आज भुसेंनी लोणावळा ते खालापूर दरम्यान उभारण्यात येत असलेल्या मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी केली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सध्या लोणावळा ते खालापूर हे अंतर 19 किलोमीटर इतके आहे.
या प्रवासादरम्यान बोरघाटात होणारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते. ही कोंडी या मिसिंग लिंकमुळं फुटेल असा विश्वास सरकारला आहे. सोबतच प्रस्तावित मार्गाने सहा किलोमीटरची आणि किमान अर्धा तासाची बचत होणार आहे. एकूण 13 किलोमीटरच्या या मिसिंग लिंकमध्ये दोन बोगदे आणि दोन पूल उभारले जात आहेत. पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा मिसिंग लिंक सप्टेंबरमध्ये खुला होईल. प्रत्यक्षात याची पाहणी केल्यावर दादा भुसेंनी असा दावा केला.
कसा आहे मीसिंग लिंक प्रकल्प ?
खालापूर ते सिंहगड असा हा मिसिंग लिंक प्रकल्प असेल. आता जर आपण पाहिले तर खालापूर ते सिंहगडपर्यंतचे अंतर हे 19 किलोमीटर इतके आहे. मिसिंग लिंक प्रकल्प सुरु झाल्यानंतर हे अंतर 13.30 किलोमीटर इतके होईल. एकंदरीत 6 किलोमीटर इतके अंतर या प्रकल्पामुळे कमी होईल तसेच घाटातील अपघात टाळण्यासाठी आणि शून्य अपघात रस्ता बनवण्यासाठी हा प्रकल्प सुरु करण्यात आला. प्रवासाचे तासही कमी होणार आहेत. यातील बोगद्याची एकूण लांबी 10.55 किमी, त्यापैकी 2.5 किमी बोगदा लोणावळा तलावाच्या तळापासून 175 मीटर खालून जातो. हा आशिया खंडातील सर्वात रुंद बोगदा असून त्यांची रुंदी 23.75 मीटर आहे. एकूण 2 ब्रीज, एकाची लांबी 900 मीटर तर दुसरा केवळ स्टेन्ड ब्रीज 650 मीटर लांब असेल. प्रकल्प सुरु झाला मार्च 2019 ला तर डेडलाईन आहे डिसेंबर 2023 ची आहे.
कांद्यावरील वक्तव्याचा विपर्यास केला गेला - भुसे
कांदा परडवत नसेल तर खाऊ नका, या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. असं म्हणत मंत्री दादा भुसेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न ही केला. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क धोरण आणल्याने, शेतकरी आणि विरोधक आक्रमक झालेत. त्यालाच अनुसरून मंत्री भुसेंनी एक वक्तव्य केलं अन त्यांच्यावर टीकेची झोड उठली. पण मी ही शेतकऱ्यांचा मुलगा आहे, त्यामुळं काबाड कष्ट करून पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला भाव मिळावा. हा त्या वक्तव्यामागचा हेतू होता. असं स्पष्टीकरण ही भुसेंनी यावेळी दिलं.