Pune Metro News : पुणेकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी पुणे मेट्रोने आणखी एक यशस्वी पाऊल टाकलं आहे. भूमिगत मेट्रोच्या पहिल्या 3 किलोमीटर टप्पा असलेल्या मार्गावर आज पहिली चाचणी पार पडली. शिवाजी नगर ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर ही चाचणी पार पडली. मार्च 2023 पर्यंत पुणे मेट्रो सुरु होण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्धार आहे. पुणेकरांना भूमिगत मेट्रोची उत्सुकता होती. आज अखेर चाचणी पार पडली. येत्या काही दिवसांत पुणेकरांसाठी भूमिगत मार्गावरील मेट्रो उपलब्ध असेल.
कशी पार पडली पहिली चाचणी?
पुण्यातील भूमिगत मेट्रोच्या पहिल्या 3 किलोमिटर टप्पा असलेल्या मार्गावर आज पहिली चाचणी पार पडली. पुण्यातील रेंज हिल डेपोपासून एलिव्हेटेड मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रो धावली आणि त्यानंतर ही मेट्रो रॅम्पचा सहाय्याने भूमिगत ट्रॅकवर आणण्यात आली. शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर या ट्रेनची चाचणी करण्यात आली आणि तिथून पुढील स्टेशन सिव्हिल कोर्ट या स्टेशनवर देखील मेट्रोची चाचणी पार पडली. पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम हे 85 टक्क्यांहून अधिक झाल्याची माहिती, मेट्रो अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मेट्रोसाठी एक नवीन आणि यशस्वी पाऊल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील मेट्रोला मागील वर्षी मार्च महिन्यात हिरवा झेंडा दाखवला. वनाज ते रामवाडी या मार्गावर, गरवारे महाविद्यालय ते वनाज हा पहिला टप्पा सुरू झाला असला तरी सुद्धा संपूर्ण मार्गावर मेट्रो कधी धावणार हा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. भूमिगत स्थानकावर आज झालेली चाचणी हे पुणे मेट्रोसाठी एक नवीन आणि यशस्वी पाऊल आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना भूमिगत मार्गावरील मेट्रोत प्रवास करता येणार आहे.
मेट्रोचं एकूण अंतर 33 किलोमीटर आणि 11,420 कोटी रुपये खर्च
पुणे मेट्रोसाठी एकूण 11,420 कोटी रुपये खर्च येणार आहे. मेट्रोचे एकूण अंतर हे 33 किलोमीटर आहे. यात 10 किलोमीटर अंतर हे भूमिगत तर 27 किलोमीटर एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. पुण्यात वनाज ते गरवारे हा पहिला टप्पा सध्या सुरु करण्यात आला आहे. या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी वनाज ते डेक्कन या मार्गावर मेट्रोचाचणी करण्यात आली होती. ती चाचणी यशस्वी ठरली आहे. आता वनाज ते रामवाडी तसेच स्वारगेट ते पिंपरी हे मेट्रोचे काम जलद गतीने सुरू आहे.